एव्हिएशन गॅलरी' पुन्हा घेणार ''टेक ऑफ'', निविदा प्रक्रिया १५ ते २० दिवसात पूर्ण होणार
पुणे: तांत्रिक कारणामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद पडलेल्या महापालिकेची "एव्हिएशन गॅलरी'ला पुन्हा टेक ऑफ घेणार आहे. यासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एव्हिएशन गॅलरी सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
शिवाजीनगर गावठाण परिसरात कोट्यावधी रूपये खर्च करून "सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी' महापालिकेने उभारली होती. मार्च २०२० मध्ये एव्हिएशन गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर कोरोना महामारीमुळे ही गॅलरी बंद ठेवण्यात आली होती. मात्र ती पुन्हा सुरु करण्याचा विसर महापालिकेला पडला होता. तसेच एव्हिएशन गॅलरी चालविण्यासाठी आवश्यक विमान क्षेत्राशी संबंधित संस्था पुढे येत नसल्याने एव्हिएशन गॅलरीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. याबाबत नागरिकांनी तसेच प्रसार माध्यमांनी अनेक वेळा आवाज उठवला होता. मात्र याबाबत पालिका उदासीन असल्याचे दिसून आले. अखेर पालिकेला जाग आली आहे. एव्हिएशन गॅलरी पुन्हा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गॅलरी चालविणे व त्याच्या देखभाल दुरूस्तीच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरूवात झाली आहे. काही संस्थांनी आत्तापर्यंत प्रतिसाद दिला आहे, यासाठीची निविदा प्रक्रिया सहा नोव्हेंबरला सुरू झाली असून 17 नोव्हेंबरला निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. महापालिकेच्या अटी व शर्तींचे पालन करणाऱ्या संस्थेला एव्हिएशन गॅलरीचे काम देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १५ ते २० दिवसात पूर्ण होईल, त्यानंतर महापालिकेकडून पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. पुन्हा गॅलरी सुरु झाल्यानंतर शहरातील लहान मुलांना लवकरच पुन्हा एकदा जगभरातील विमान क्षेत्राशी संबंधीत माहिती मिळणार आहे. तसेच विमानांचे मॉडेल्स पाहण्याची संधीही मिळणार आहे.
एव्हिएशन गॅलरी पुन्हा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. त्यानुसाकर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत ही निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर ही गॅलरी सुरू करण्यासाठीचा मार्ग मोकळा होईल.
- चेतना केरूरे, उपायुक्त, सांस्कृतिक विभाग, महापालिका.