सोलापूर रस्त्यावर महापालिकेची अतिक्रमण विरोधी धडक कारवाई
पुणे: महापालिकडून (PMC) शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण (Encroachment) हटविण्याची धडक कारवाई करण्यात आहे. त्याअंतर्गत सोलापूर रस्त्यावरील बेकायदा बांधकामावर महापालिकेने हातोडा चालवत अतिक्रमण विरोधी कारवाई केली. (Pune News)
शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या वाहकतूकीचे १५ रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आदर्शवत असे रस्ते तयार करण्याचे प्रशासनाने ध्ये ठेवले आहे. त्यानुसार अतिक्रमण मुक्त आणि स्वच्छ रस्ते करण्याची मोहिम महापालिकने तीव्र केली आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई पालिकेकडून करण्यात येत आहे. मंगळवारी पालिकेकडून सोलापूर रस्त्यावरील बेकायदा बांधकामे पाडण्यात आली. तसेच रस्त्यांवर उभी केलेल्या बेकायदा हातगाड्या, दुकांनांसमोरील बेकायदा फलक हटविण्यात आले आहेत. तसेच रस्त्यातील जुने विद्युत खांब देखील काढण्यात आले.
रस्त्यावरील पदपथ पादचाऱ्यांसाठी तयार केलेले असतात. मात्र भाजी, फळ विक्रेते तसेच इतर व्यवसायिकांनी ते व्यापल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. यावर कडक धोरण राबवत पालिकेकडून पदपथ मुक्त करण्यात येत आहेत. रस्त्यावर साठलेला कचरा, माती यामुळे मोठ्या प्रमाणात धुळ निर्माण होत असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आह. त्याची दखल घेत रस्त्याची साफसफाई करण्यात येत आहे.
बाणेर, मुंढवा, नगर रस्त्यावरील हटविले होते अतिक्रमण
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीत अडकल्याने अनेकांना कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहचण्यासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे महापालिकेकडून मुळ रस्त्याची जागा ताब्यात घेवून रुंदीकरण करण्याचे काम सुरु आहे. मागच्या आठवड्यात पालिकेने बाणेर रस्ता, मुंढवा, नगर रस्त्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती. रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत. अतिक्रमण काढून घेण्याची विनंती पालिकेकडून संबंधितांना देण्यात येते. त्यानंतर नोटीस पाठवली जाते. त्यानंतरच अतिक्रमण विरोधी थेट कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे कारवाई दरम्यान नागरिकांचे नुकसान होत नाही. रस्त्यावरील अतिक्रमण विरोधी कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
शहाराली मुख्य १५ रस्त्यांची निवड आदर्श रस्ते म्हणून करण्यात आली आहे. त्या रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई करण्यात येत आहे. त्याप्रमाणे नगर रस्त्यावरील रस्त्याचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले. पालिकेचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. तसेच अनधिकृत केबल्स काढण्यात येत आहेत.
- विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त
अनधिकृत केबल्सही तोडल्या...
पुणे महानगरपालिकेच्या विद्युत खांबावर केबल अनधिकृतपणे टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्याचे विद्रूपीकरण झाले आहे. महापालिकेच्या नाकावर टिच्चून केबल्स विद्युत खांबावरून इमारतीवरून झाडांवरून जेथे जागा मिळेल तेथे अशा केबलचे जाळे पसरले आहे. अनेक केबल्स तुटल्या असून रस्त्यावर लोंबकळत पडल्या आहेत. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रार करुन त्याबाबत कोणतीही कार्यवाही पालिकेकडून करण्यात येत नाही. अशी नागरिकांची तक्रार आहे. केबलमुळे परिसराचा बकालपणा वाढला आहे. त्यावर आता पालिकेकडून कारवाई करण्यात सुरवात करण्यात आली आहे. सोलापूर रस्त्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान रस्त्यांवरील अनधिकृत केबल्स देखील तोडण्यात आल्या आहेत.