सोलापूरच्या तोतया पत्रकारांवर पुण्यात आणखी एक तक्रार
सीविक मिरर ब्यूरो
आपण पत्रकार असल्याची बतावणी करणाऱ्या सोलापूरच्या दोन तोतयांविरोधात पुण्याच्या खंडणीविरोधी पोलीस पथकाकडे आणखी एक तक्रार आली आहे. गुरुवारी रात्री पोलीस त्यांना पकडण्यासाठी गेल्यावर त्यांनी पोलिसांच्या अंगावार चारचाकी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी बचावासाठी त्या दोघांच्या गाडीच्या मागील टायरच्या दिशेने गोळीबार केला आणि पाठलाग करून त्यांना अटक केली.
महेश सौदागर हनमे (वय ४७) आणि दिनेश सौदागर हनमे (वय ४४, दोघे रा. राजेश्वरीनगर, ब्लॉक नं. ११२, बाळे, उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) अशी संबंधित तोतयांची नावे असून, त्यांनी पुणे आणि सोलापूरस्थित बिल्डरकडे ५० लाख रुपये आणि दोन फ्लॅटच्या खंडणीची मागणी केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे. दरम्यान, तोतया पत्रकार हनमे बंधूंना शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीचे मालक संतोष पोपट थोरात (रा. अल्कॉन सोसायटी, खराडी) यांच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तोतया पत्रकार हनमे बंधूंना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-२ ने अटक केली आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलीस गेले असता हनमे बंधूंनी त्यांच्यावर गोळीबार केला.
दरम्यान, हनमे बंधूंचे आणखी एक खंडणी प्रकरण उजेडात आले आहे. त्याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस सखोल तपास करीत आहेत. पुण्यातील भोसरीमध्ये राहणाऱ्या एका बिल्डरची कन्स्ट्रक्शन साईट सोलापूर येथे सुरू आहे. हनमे बंधूंनी त्या बिल्डरकडेदेखील ५० लाख रुपये आणि दोन फ्लॅटच्या खंडणीची मागणी केली होती. याबाबत संबंधित बिल्डरने गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे संपर्क साधला असून पोलीस त्याबाबतचा तपास करीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हनमे बंधूंना खंडणी विरोधी पथक-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, साहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, फौजदार श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, अंमलदार विजय गुरव, प्रदीप शितोळे, विनोद साळुंके, सचिन अहिवळे यांच्या पथकाने अटक केली होती.