Pune News: कार्ट्यांना सांभाळा; अजित पवारांचा सज्जड दम

पुण्यात कोयता गँगची दहशत आहे. कोयता गँगकडून प्रचंड तोडफोड केली जाते तसेच अनेकांवर हल्लेही केले जातात. त्यामुळे पुण्यात वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो.

संग्रहित छायाचित्र

कोयता गँगचा सुफडा साफ करण्याचे पुणेकरांना आश्वासन

पुण्यात कोयता गँगची (Koyta Gang in Pune) दहशत आहे. कोयता गँगकडून प्रचंड तोडफोड केली जाते तसेच अनेकांवर हल्लेही केले जातात. त्यामुळे पुण्यात वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो. याची दखल घेत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना कोयता गँगचा सुफडा साफ करणार, असं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर या कोयता गॅंगमधील मुले हाताबाहेर जाण्यापूर्वी त्यांच्या आईवडिलांनी योग्य समज द्यावी, असेदेखील अजित पवार यांनी सुनावले.

“कायदा-सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोयता गँगचा सुफडा साफ करणार,’’ असंही आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे. “कसली कोयता गँग रे? कोयता गँगचा सुपडा साफ करणार आहे. या गोष्टी अजिबात खपवून घेणार नाही. ते पोरगं कितीही मोठ्या बापाचं असलं तरीसुद्धा आता काही चालणार नाही. काही लोकं म्हणतात की आता चूक झाली पदरात घ्या. आता पदर फाटला. पदर नाही, धोतर नाही आता डायरेक्ट टायरमध्ये,’’ असं अजित पवार बेधडकपणे म्हणाले.

विरोधकांकडे मुद्दा नसल्याची टीका

विरोधकांना आता मुद्दा राहिलेला नाही. ते म्हणतात, सगळं गुजरातमध्ये चाललंय. जे महाराष्ट्राचं आहे ते महाराष्ट्राचंच राहणार. काही राज्यकर्ते चुकीचे निर्णय घेतात. विद्यापीठ पूल काढावा लागला. विक्रम कुमार काम जोरात करा. आम्ही मंत्रालयात बसून सगळे प्रश्न मार्गी लावायचे काम करतो. सगळे आमदार या गोष्टींचा पाठपुरावा करत आहेत. राज्यातील विकास कामांचे प्रकल्प पूर्ण करणार आहोत. पुण्यात १,१७५ कोटी रुपयांच्या कामाचं भूमिपूजन झालं आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आणि सौंदर्यपूर्ण काम झालं पाहिजे. पुणेकरांना सुविधा देण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

‘‘१२-१५ वर्षांची मुले हातात कोयता, तलवारी हातात घेऊन फिरत बसतात. त्यामुळे या मुलांच्या आई-वडिलांना बोलविणार आहे. आई-वडिलांनी आपल्या कार्ट्यांना नीट वागायला शिकविले पाहिजे. ‘मला काय माहिती माझे पोरगं असे काय करतो,’ हे मी अजिबात ऐकून घेणार नाही.   आई-वडिलांना आपल्या मुलामुलीचे मित्रमैत्रिणी कोण आहेत? ते काय करतात, हे माहित असायला पाहिजे. कितीही मोठ्या बापाचा मुलगा असला तरी मुलाहिजा ठेवणार नाही. विश्रांतवाडीत परवा जी घटना घडली, त्यातील मुलांना हुडकून काढतो. पुणे विद्येचे माहेरघर आहे. या प्रतिष्ठेला कमीपणा येईल, असे वागू नका,’’ असे अजित पवार म्हणाले.

नवीन पोलीस आयुक्त आल्यानंतर साडेचार हजार कोटीचे ड्रग्ज पकडले आहे. त्याचे धागेदोरे  लंडन, पंजाब, दिल्लीपर्यंत आहेत. झटपट श्रीमंत होण्यासाठी असले उद्योग केले जात आहेत. चांगले लोक अडचणीत आणि नवीन पिढी व्यसनाधीन होत आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest