एकीकडे 'एके ४७' तर दुसरीकडे 'एसएलआर गन'... एकीकडे 'स्टेनगन' तर दुसरीकडे '९ एमएम पिस्तूल'... वाहतूक पोलिसांची कार्यशैली... कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू... पोलिसांची बिनतारी संदेश यंत्रणा... सायबर गुन्हेगारी... एनडीआरएफ आणि फॉरेन्सिक लॅब अशा एक ना अनेक माध्यमातून पोलिसांची कार्यपद्धती आणि क्षमता यांची प्रचिती नागरिकांना आली. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित 'तरंग' या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाने शौर्य, धैर्य आणि त्यागाची गाथा पुणेकरांसमोर उलगडली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी (दि. २२) या उपक्रमाला गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत पोलिसांच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच, शनिवारी (दि. २३) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली. पोलीस दलातील विविध शाखा, घटक यांची परिपूर्ण माहिती उत्सवात देण्यात आली आहे. 'तरंग-२०२३' कार्यक्रम रविवारपर्यंत (दि. २४) सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत नागरिकांसाठी खुला राहणार आहे.
'तरंग'च्या उद्घाटनाला अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त रोहिदास पवार, आर. राजा, शशिकांत बोराटे, अमोल झेंडे, संदीपसिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे हेदेखील उपस्थित होते. पोलिसांच्या विविध विभागांनी यात उत्साहाने भाग घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावर कायम प्रथम क्रमांक पटकावलेल्या पोलीस बॅंडने यावेळी उपस्थितांना स्तिमित करून सोडले. 'मेरा जुता है जपानी', 'आओ बच्चो तुम्हे दिखाये झांकी हिंदुस्थान की', 'मेरे देश की धरती' आदी गाण्यांच्या सुरेल धून ऐकून उपस्थित नागरिक आणि विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. 'क्विक रिस्पॉन्स टीम'ने (क्यूआरटी) शहरात घुसलेल्या दहशतवाद्याला कंठस्नान घालून नागरिकांना सुरक्षा प्रदान केल्याचे प्रात्यक्षिक पाहून तर सर्वांच्या अंगावर शहारे आले. पोलीस अंमलदार नितीन जगताप यांनी मंचावरून बहारदार शास्त्रीय गायन सादर करून उपस्थितांच्या उत्स्फूर्त टाळ्या मिळवल्या.
या ठिकाणी विविध विभागांकडून साहित्य विक्रीचे स्टॉलदेखील लावण्यात आले आहेत. विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी दोन दिवसांत या प्रदर्शनाला भेट देत पोलिसांशी संवाद साधत माहिती घेतली. पोलिसांची शस्त्रे कशी असतात? ही शस्त्रे कशी चालविली जातात? त्यामध्ये असलेल्या गोळ्या कशा असतात? पिस्तूल, रिव्हॉल्वर, गन यामधील फरक काय असतो, अशा अनेक प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी चिमुकले उत्साही होते. एनडीआरएफच्या जवानांनी आपत्कालीन परिस्थितीत कसे बचाव कार्य केले जाते? त्यासाठी कोणकोणती उपकरणे वापरली जातात, याचीदेखील माहिती दिली. तसेच, वाढते सायबर गुन्हे याचेदेखील सविस्तर सादरीकरण याठिकाणी केले जात आहे. पोलिसांचे गणवेश कसे असतात? त्यावर कोणकोणती चिन्हे असतात? पोलिसांची 'बुलेटप्रूफ' गाडी कशी काम करते, अशा अनेक प्रश्नाची उत्तरे आबालवृद्ध जाणून घेत होते.
'किड्स झोन' विशेष आकर्षण
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण हे पोलीस घटकांचे प्रदर्शन असून त्यामध्ये पोलीस दलातील विविध शाखा आणि त्या शाखांमधील चालणारे कामकाज याविषयी ऑडियो, व्हीडीओच्या माध्यमांतून माहिती सांगण्यात येत आहे. सांस्कृतिक कलेचा वारसा असलेल्या पुणे शहरातील स्थानिक कलाकार यांची कलाकृती (आर्टिसन गॅलरी) या शीर्षकाखाली सर्व सामान्यांसाठी प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामध्ये पुण्यातील स्थानिक कलाकारांची मातीची भांडी कलाकृती, पर्यावरणपूरक प्लास्टिक पदार्थाच्या पुनर्वापरातून पुर्कल्पाने तयार केलेल्या उपयोगी वस्तू, तांबे, पितळ या भांड्यांचे प्रदर्शन, फुलझाडे, रोपवाटिका यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. नवीन पिढी, लहान बालके यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, म्हणून विज्ञानात प्रदर्शन, मुलांसाठी क्रीडाप्रकार, व्हीडीओच्या माध्यमांतून लहान बालकांसाठी ‘गुड टच, बॅड टच’ यासारखे प्रबोधनपर प्रदर्शन 'किड्स झोन'च्या माध्यमांतून प्रदर्शित करण्यात आले आहे. विविध मनोरंजनाचे कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात येत आहेत. खाद्य संस्कृतीचेही स्टॉल प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. भारतातील विविध कलाकुसर, खादी, दाग-दागिने, देशी पदार्थ, कपड्यांसह विविध वस्तू प्रदर्शनात आहेत.
हा उत्सव खऱ्या अर्थाने 'मैत्रीचा उत्सव' असून पोलीस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करणारा असल्याने नागरिकांनी उत्सवात आवर्जून सहभाग घ्यावा. या उत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कला, संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासोबत पोलीस दलाविषयी माहितीदेखील मिळते. पोलीस हा आपला खऱ्या अर्थाने मित्र आहे, ही भावना दृढ होऊन परस्पर सहकार्याला चालना मिळते. यातूनच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. नागरिकांनी आवर्जून या उत्सवात सहभागी होत सुट्टीच्या दिवसाचा आनंद घ्यावा आणि पोलीस दलाविषयी जाणून घ्यावे.
- चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री
पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, नोकरदार वर्ग यांनादेखील पोलिसांविषयी असलेले गैरसमज दूर व्हावे, त्यांच्या कामाविषयी आणि पोलिसांच्या दैनंदिन कामात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञान, कौशल्य, साधनसामग्री यांची माहिती देण्याकरिता हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात मराठी सेलिब्रिटीदेखील सहभागी होणार आहेत. पुणेकर नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा.
- रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे