अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने ७५ हजार पुणेकर भाविकांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात स.प महाविद्यालयाच्या मैदानावर रामरक्षा पठण केले.
भक्तिसुधा फाउंडेशन, समर्थ व्यासपीठ, शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने या कार्यक्रमाचे निमंत्रक होते.
आमदार चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह प्रविण दबडघाव, पुरातत्व आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक गो. बं. देगलूरकर, कीर्तनकार चारुदत्त आफळे, अभिनेता राहुल सोलापूरकर, सुहास क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीरामासाठी नमन, देशासाठी समृद्धी आणि सैनिकांसाठी बल अशा तीन संकल्पांसाठी तीन वेळा पठण करण्यात आले. स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या आश्रमातील शिष्यांनी रामरक्षा पठणाचे नेतृत्व केले.
लक्ष्मणाचार्य रचित रघुपती राघव राजाराम या मूळ पदाचे प्रथमच सादरीकरण केले. आशिष केसकर यांचे संगीत आणि चारुदत्त आफळे गायन केले. अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी रामजन्मभूमीचा इतिहास सांगितला.
अयोध्येत उभारण्यात आलेले राम मंदिर हे नागर शैलीचे आहे. या पद्धतीत गाभाऱ्यावर शिखर येते त्यावर कलश असतो. गाभारा, शिखर यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हे मंदिर शास्त्रीयदृष्ट्या योग्यच असल्याचे मत डॉक्टर देगलूरकर यांनी व्यक्त केले.
हेमंत रासने म्हणाले, या कार्यक्रमाचे निमंत्रक होण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. या उपक्रमातून आपणा सर्वांना मोठी ऊर्जा मिळाली असून या ऊर्जेचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.