पिंपरी-चिंचवड : कल्पतरू सोसायटीचे भवितव्य अधांतरी; बांधकाम परवानगीसाठी बनावट व खोटी मोजणी

पिंपळे गुरव येथील कल्पतरू बांधकाम विकासकाचा मोजणी नकाशा नगर भूमापन कार्यालयाशी सुसंगत नाही. त्यामुळे विकासकाचा विकास योजना अभिप्राय रद्द करत बांधकाम परवानगी निलंबित करण्याचे महापालिका कायदा आणि नगररचना विभागाने कळवले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Sun, 30 Jun 2024
  • 12:59 pm
Kalpataru Society

एक हजार फ्लॅटधारक अडचणीत, परवाना रद्द करण्यास महापालिकेकडून टाळाटाळ

पिंपळे गुरव येथील कल्पतरू बांधकाम विकासकाचा मोजणी नकाशा नगर भूमापन कार्यालयाशी सुसंगत नाही. त्यामुळे विकासकाचा विकास योजना अभिप्राय रद्द करत बांधकाम परवानगी निलंबित करण्याचे महापालिका कायदा आणि नगररचना विभागाने कळवले होते. मात्र, महापालिका बांधकाम विभागाकडून बांधकाम परवानगी रद्द करण्यासह त्या बांधकामास स्थगिती देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे या प्रकरणी शासनाच्या विधानसभा उपाध्यक्षांकडे सुनावणी सुरू झाली असून यामुळे कल्पतरू सोसायटीचे भवितव्य अंधारमय झाले आहे. यामुळे सुमारे एक हजार फ्लॅटधारक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मौजे पिंपळे गुरव येथील सर्व्हे नं. ८५/१अ/ १, ८५/१ब/ २/ १, ८६ /२ब /१, ९०/ २/ १, ९१/ १अ, सर्व्हे नं. २००९, २०५७ पै, या जागेवर कल्पतरू कन्स्ट्रक्शनचे विकासक ईस्माईल एम. कांगा आणि इतर यांचे तर्फे कुलमुखत्यारधारक जयंत छगनलाल ओसवाल यांची मालकी आहे. परंतु, मिळकत क्रमांक ९०/१ ही मिळकत आमच्या मालकीची वहिवाट आहे. पण, त्या मिळकतीत ईस्माईल एम.कांगा व इतर यांनी अतिक्रमण केले असल्याचा दावा अतुल दिलीप काशीद यांनी केला आहे.  

त्यानुसार मूळ लेआऊट मंजूर करून घेतला आहे. या लेआऊटमध्ये त्यांनी अनधिकृतरित्या आमच्या मालकीची मिळकत ही त्यांच्या मालकीची असल्याचा खोटा व चुकीचा बांधकाम नकाशा मंजूर करून घेतला आहे. याबाबत उपसंचालक भूमी अभिलेख, पुणे यांचे आदेश विरुध्द महसूलमंत्री यांचे न्यायालयात रिव्हिव्ह पिटिशन दाखल केले होते. त्या प्रकरणात उपसंचालक, भूमी अभिलेख यांच्या आदेशाच्या अंमलबजावणीस अंतिम निर्णयापर्यंत स्थगिती दिलेली आहे. 

दरम्यान, सदरील प्रकरणात महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी १३ मार्च २०२४ रोजी पारित केलेल्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, त्या सदर मिळकतीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास आणि सदर मिळकतीवर चालू बांधकामास पूर्णत्वाचा दाखला देण्यात येऊ नये. तसेच त्या मिळकतीवर कोणत्याही प्रकारचे रिव्हाईज प्लॅन देण्यात येऊ नये. मूळ बांधकाम परवानगीप्रमाणे सदर मिळकतीमध्ये सुरू असलेल्या सर्व बांधकामास स्थगिती देण्यात यावी,  अशी मागणी अतुल दिलीप काशीद यांनी शहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे केली आहे. तसेच कल्पतरू कन्स्ट्रक्शन विकासकांकडून सुरू असलेल्या बांधकामास स्थगिती द्यावी, तसेच यापूर्वीची बांधकाम परवानगी रद्द करावी, या संदर्भात महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष, यांच्याकडे सुनावणी सुरू झाली आहे. २५ जून रोजी झालेल्या सुनावणीला दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे. त्यामुळे कल्पतरू कन्स्ट्रक्शनचा बांधकाम परवानगी रद्द झाला. तब्बल एक हजार फ्लॅटधारक अडचणीत येणार आहे. त्यामुळे कल्पतरू सोसायटीचे भवितव्य काय, असा प्रश्न तेथील राहणाऱ्यांना नागरिकांना पडला आहे.

नगर भूमापनकडून फेरमोजणी आदेश

पिंपळे गुरव येथील कल्पतरू कन्स्ट्रक्शन या विकासकांचा मोजणी नकाशा हा नगर भूमापन कार्यालयातील अभिलेखाशी सुसंगत नाही. त्यामुळे विकासकांनी एकत्र मोजणी करून फेरमोजणी करून घ्यावी, असे आदेश दिलेले आहेत. यामध्ये मोजणी क्रमांक १३३७ /२००५ नुसार ९ सप्टेंबर २००५ हा मोजणी नकाशा या विभागात उपलब्ध अभिलेखास सुसंगत नाही. त्यामुळे विकासकांना विकास योजना अभिप्राय देण्याची कारवाई करता येणार नाही, असे पत्र महापालिकेच्या नगररचना अधिकारी यांना १८ आॅक्टोबर २००५ रोजी नगर भूमापन अधिकारी आणि विकासक यांना पत्राने कळवले आहे. तसेच नगर भूमापन अधिकारी यांनी  १४ मार्च २०१९ रोजी अर्जदार व कल्पतरू कन्स्ट्रक्शन यांनी एकत्र मोजणी करून फेरमोजणी करून घ्यावी, असेही आदेश दिलेले आहेत.

स्थगिती देण्यास टाळाटाळ  

महापालिकेच्या नगररचना विभागाकडून कल्पतरू कन्स्ट्रक्शन यांचा विकास योजना अभिप्राय रद्द करत बांधकाम परवानगी निलंबित करण्याचे कळवले होते. मात्र, बांधकाम अधिकाऱ्यांकडून बांधकाम परवानगी निलंबित न करता बांधकामास स्थगिती देण्यास टाळाटाळ होत आहे. 

महापालिकेच्या कायदा विभाग यांच्या अहवालानुसार आणि उपसंचालक नगररचना विकास विभाग यांनी  ६ एप्रिल २०२१ रोजी पत्र देऊन सह-शहर अभियंता, बांधकाम परवानगी विभाग यांना पत्र देऊन बांधकाम परवाना निलंबित करण्यास कळवले होते. तरीही अद्याप कोणतीही कारवाई बांधकाम अधिकाऱ्यांकडून केलेली नाही.

शासनाची फसवणूक, पोलिसांकडून कारवाई नाही

पिंपरी नगर भूमापन अधिकारी यांनी २७ आॅक्टोबर २०२० रोजी पोलीस निरीक्षक, सांगवी पोलीस स्टेशन यांना पत्र देऊन दि. ९ / ९ /२००५ रोजीची 'क' प्रत ही आमच्या कार्यालयाकडून निर्गमित झालेली नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे कल्पतरू कन्स्ट्रक्शन यांनी महापालिकेच्या नगररचना विभागात २००५ मध्ये बनावट मोजणी नकाशा 'क' प्रति सादर केलेली आहे. यामुळे नगर भूमापन यांच्या अभिलेखाशी मोजणी नकाशा 'क' प्रत सुसंगत नसतानादेखील महापालिका मोजणी नकाशा 'क' प्रत सादर करून विकास योजना अभिप्राय घेत बांधकाम परवानगी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे नगरभूमापन कार्यालय, महापालिकेची देखील फसवणूक व दिशाभूल संबंधित विकसकाने केलेली आहे. याबाबत विकसकावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु अद्यापही पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.

कल्पतरू कन्स्ट्रक्शनच्या सदर बांधकामास स्थगिती द्यावी म्हणून एक महिन्यापूर्वी बांधकाम विभागाकडे तक्रार केली. त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. बांधकाम अधिकाऱ्यांना वारंवार भेट देऊन, पाठपुरावा करूनही त्यांनी विकासकास 'स्टॉप वर्क'ची ऑर्डर दिलेली नाही. बांधकाम अधिकारी हे फक्त राजकीय नेते, बिल्डर लोकांची कामे फोनवर करतात. आम्ही अर्ज देऊन महिनाभर पाठपुरावा करूनदेखील त्या अर्जावर कारवाई केली जात नाही. महसूलमंत्र्यांचा आदेश असताना देखील सदर प्रकरण कायदा विभागाकडे अभिप्राय घेण्यास पाठवले आहे. महसूल मंत्री यांच्या आदेशाला महापालिकेतील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे.

- अतुल काशीद, तक्रारदार नागरिक

पिंपळे गुरव येथील कल्पतरू कन्स्ट्रक्शन यांच्या बांधकामास स्थगिती देण्यासंदर्भात महसूलमंत्री यांच्या आदेशावर महापालिका कायदा विभागाकडून अभिप्राय मागवला आहे. तसेच बांधकाम परवानगी रद्द करण्यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्षाकडे अद्याप सुनावणी सुरू आहे. त्यांनी २५ जून रोजी तक्रारदार आणि महापालिकेचे म्हणणे लेखी स्वरूपात सादर करण्यास सांगितले. त्यानुसार आमचे म्हणणे सादर करण्यास वेळ मागितला आहे.

- मकरंद निकम, शहर अभियंता, बांधकाम नियंत्रण व परवानगी विभाग, महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest