संग्रहित छायाचित्र
गेल्या अनेक वर्षापासून भूसंपादनाअभावी अडथळा आलेल्या काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) बीआरटी मार्ग लवकरच सुरू होणार आहे. या ठिकाणाचा भूसंपादनचा तिढा सुटला असून, त्या जागेवरील बांधकाम पाडण्यात आले आहे, लवकरच रस्त्याची निर्मिती होऊन त्या ठिकाणारून बीआरटी बससेवा सुरू होईल. सद्यस्थितीमध्ये रिकाम्या झालेल्या इमारतीचे बांधकाम काढण्यात आले असून, त्याचा राडारोडा व इतर कामे सुरू आहेत. येत्या काही दिवसांतच या ठिकाणी रस्ता पूर्ण करून हा मार्ग सुरू करणार असल्याचे महापालिकेच्या अधिकार्याने सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम (बीआरटीएस) प्रकल्प उभारले आहेत. त्यात निगडी-दापोडी, औंध- सांगवी फाटा- रावेत- किवळे, नाशिक फाटा- वाकड, दिघी-आळंदी, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) आणि निगडीतील भक्ती-शक्ती चौक-मुकाई चौक किवळे या मार्गाचा समावेश आहे.
भक्ती-शक्ती ते किवळे मार्ग तयार आहे. मात्र, बससेवा अद्याप सुरू झालेली नाही. अन्य मार्गावर बससेवा सुरू आहे. काळेवाडी फाटा ते देहू- आळंदी रस्त्यांवर आयुक्त बंगल्यासमोरील भूसंपादन रखडलेले होते. त्यामुळे या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला होता. बस या मार्गापर्यंत आल्यानंतर पुन्हा सेवा रस्त्यावरती येत होती. परिणामी, संपूर्ण बीआरटी मार्ग कधी सुरू होणार असा प्रश्न प्रवाशांच्यावतीने करण्यात येत होता.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, बीआरटी विभाग आणि पीएमपीएल अधिकाऱ्यांची याबाबत अनेक बैठका झाल्या. मात्र त्यावरती तोडगा निघू शकला नव्हता. या जागेवरती असलेल्या कंपन्यांनी विरोध केल्याने हा मार्ग रखडला होता. त्यात दोन कंपन्यांच्या इमारती होत्या. आता तो प्रन्न सुटला असून, इमारती हटविण्यात आल्या आहेत. त्यांचा राडारोडा हटविण्याचे काम शनिवारी सुरू होते.
पूर्णानगर चौकापासून देहू-आळंदी रस्त्यापर्यंत (चिखली) बीआरटी मार्ग नसून चारपदरी रस्ता आहे. आता आयुक्त बंगल्यासमोरील मार्ग झाल्यानंतर बीआरटी सेवा सुरू होईल. सद्यःस्थितीत केएसबी चौकापासून संघवी केसरी महाविद्यालय - मोहननगर कॉर्नर- ऑटो क्लस्टर कॉर्नर पुन्हा बीआरटी मार्ग अशी बससेवा सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरती वेळ वाढत होता. येत्या काही दिवसांमध्ये येथील मार्ग पूर्ण झाल्यानंतर विनाअडथळा बीआरटीमध्ये बस धावणार आहे.
३ इमारती पाडल्या, काम वेगाने सुरू
या मार्गातील ६० मीटर असलेल्या ठिकाणांचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी असलेल्या दोन कंपन्यांना एमआयडीसीच्यावतीने जागा उपलब्ध करून देण्यात येईल आलेली आहे. संबंधित कंपन्यांनीदेखील त्याबाबत बांधकाम परवानगी बाबत देखील कार्यवाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्या कंपनींना कसे कळवण्यात आले. त्यानंतर कंपन्याचे बांधकाम हटवण्याचे काम सुरू करण्यात येईल. येत्या महिनाभरात हे कामकाज पूर्ण होईल. सद्यस्थितीत तीन इमारती पाडलेले आहेत. त्याचा राडाराडा उचलण्याचे काम सुरू आहे.
टप्प्याटप्प्यामध्ये रिकामे झालेल्या आस्थापना पाडण्यात येणार असून, येत्या ३ आठवड्याभरामध्ये या ठिकाणी असलेले उर्वरित इमारतीचे बांधकाम काढून रस्ता मोकळा करण्यात येणार आहे. त्यानंतर रस्त्याचे विकसन काम सुरू करण्यात येईल. लवकरच हा बीआरटी मार्ग सुरू होईल - विजय भोजने, उपअभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका