संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनेक मोठे व खर्चिक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पांसाठी सल्लागार, प्रकल्प व्यवस्थापक, आर्किटेक्ट यांच्यावर कोट्यवधींचा खर्च करूनही प्रकल्पांमध्ये त्रुटी राहत असून, प्रकल्प रखडत आहेत. त्यामुळे कामांची गुणवत्ता, दर्जा आणि सुरक्षितता राखली जावी म्हणून महापालिकेने मोठ्या व महत्वाच्या प्रकल्पांसाठी मुंबई आयआयटीचे सहाय्य घेण्याचे निश्चित केले आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या प्रत्येक मोठ्या व महत्त्वाच्या प्रकल्पासाठी मुंबई आयआयटीतील तज्ञांचा सल्ला घ्यावा लागणार आहे.
महापालिकेकडून शहरात महत्वाचे आणि अधिक खर्चाचे प्रकल्प व विकासकामे सुरू आहेत. विविध कारणांमुळे ती कामे रखडत आहेत. तसेच, कामाचा दर्जा घसरल्याचे आरोप महापालिकेवर सातत्याने होत आहेत. त्यामुळे महापालिकेची नाहक बदनामी होत आहे. सल्लागार, प्रकल्प व्यवस्थापक, आर्किटेक्ट तसेच, सिटी ट्रॉन्सर्मेशन ऑफीस (सीटीओ) आदींवर कोट्यवधी रूपयांचा खर्च करूनही असे प्रकार सातत्याने घडत आहेत. काही कामांची गुणवत्ता तपासणी पुण्यातील सीओईओपीकडून करून घेण्यात येत आहे.
असे असताना आता मुंबई आयआयटीच्या तज्ज्ञांचा आधार घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तब्बल १३ वर्षांपासून महापालिकेचा पवना बंद जलवाहिनी प्रकल्प बंद स्थितीत पडून आहे. राज्य शासनाने त्या कामावरील स्थगिती ८ सप्टेंबर २०२३ ला उठविली आहे. त्यानंतर महापालिकेने कामांची सद्यस्थिती लक्षात घेऊन त्या प्रकल्पाची दुसरा नवी डीपीआर तयार केला आहे.
महापालिकेने पवना बंद जलहिनीचा नवा डीपीआर तयार केला आहे. डीपीआर मुंबई आयआयटी या त्रैयस्थ संस्थेकडून तपासून घेण्यात येत आहे. त्यांच्याकडे मागील आठवड्यात डीपीआर पाठविला आहे. तेथील तज्ज्ञ मंडळींकडून त्याची तपासणी केली जाईल. त्यांनी काही सूचना केल्यास त्यानुसार डीपीआरमध्ये बदल केले जातील.
- अजय सुर्यवंशी, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका
महापालिकेचा छत्रपती संभाजी महाराज स्मारक हा महत्वाचा प्रकल्प आहे. मोशी येथे महाराजांचा १०० फूट उंचीचा कांस्यधातूचा पुतळा उभारण्यात येत आहे. त्याची सुरक्षा महत्वाची आहे. सुरक्षेत त्रुटी राहू नये म्हणून मुंबई आयआयटीच्या तज्ज्ञांकडून पुतळ्याची तपासणी करून घेण्यात येणार आहे. आयआयटीचे अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञान आहे. - मकरंद निकम, शहर अभियंता
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.