संग्रहित छायाचित्र
पावसाळ्यात पुराचे पाणी पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात पाणी शिरले होते. या पूरग्रस्तांचे पंचनामे झाले असून नागरिकांच्या बँक खात्यावर पैसे जमा होत आहेत. काही तांत्रिक त्रुटींमुळे अनेकांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. त्या तांत्रिक अटी दूर करून त्यांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिली.
जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड शहराला पावसाचा तडाखा बसला होता. शहरातील मुळा, पवना या नद्यांना पूर आला होता. हजारो घरांमध्ये पुराचे आणि पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना मदत देण्याची मागणी केली जाऊ लागली. त्यानंतर ७ हजार ५१९ घरांचे पंचनामे करण्यात आले. शासनाकडून पूरग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले. मात्र, अद्यापही काही पूरग्रस्तांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी अनेक वेळा संताप व्यक्त केला आहे. तलाठी कार्यालयातदेखील अनेक नागरिकांनी आंदोलन केले. काही तांत्रिक त्रुटींमुळे ही रक्कम जमा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही खात्यांचे केवायसी झालेले नाही. काही खाती बंद आहेत. काही जनधनची तर काही बँकांची खाती डिजिटल झाली आहेत. अनेक नागरिकांनी जुन्या खात्यांचे क्रमांक दिले आहेत. त्यामुळे अनुदान परत आले असल्याचे अधिकारी सांगत आहेत. सुधारित खाते क्रमांक घेऊन अनुदान परत खात्यात वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.