अपघातांची वाढती संख्या चिंताजनक; 'आपली सुरक्षितता, आपली जबाबदारी' अभियानात उपायुक्त बापूसाहेब बांगर यांचे प्रतिपादन
पिंपरी-चिंचवड : शहरात गेल्या दोन वर्षांत ३७३ रस्ते अपघातात नागरिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात जास्तीत जास्त दुचाकी आणि पायी चालणाऱ्या नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. हे चिंताजनक आहे. आपण सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित, व्यसनमुक्त जीवन जगा, जग सुंदर आहे, असे मत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त बापूसाहेब बांगर यांनी व्यक्त केले.
पिंपरी येथे सावित्रीबाई फुले सभागृहात गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या आपली सुरक्षितता, आपली जबाबदारी या कार्यक्रमात ते बोलत होते. आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त असणे गरजेचे आहे , आरोग्य अशी गोष्ट आहे की, पैशाने विकत घेता येत नाही. निरोगी आरोग्यासाठी व्यायाम, संतुलित आहार, ताणतणाव मुक्त जीवन जगा, असे आवाहन या वेळी डॉ. प्रमोद कुबडे यांनी केले. विम्यासंबंधीची माहिती कोणी गांभीर्याने घेत नाही. देशात फक्त ५ ते ६ टक्के लोकांचा विमा आहे. वार्षिक उत्पन्नाच्या २५ टक्के रकमेच्या तरी विमा घेतला पाहिजे. प्रत्येकाचा जीवन विमा ,अपघात विमा असणे गरजेचे असल्याचे बी. एल. जोशी यांनी सांगितले. तर, निवृत्त साहाय्यक आयुक्त म्हणाले की, कामगारांनी काम करताना एसओपी पाळली पाहिजे,फाजील आत्मविश्वास जीविताला घातक ठरू शकतो, कोणत्या प्रकारचे काम समजल्याशिवाय करू नये. कामगार कल्याण मंडळाचे शहराध्यक्ष मोहम्मद शरीफ मुलाणी यांनी प्रास्ताविक करून मंडळाने राबवलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. सचिव राजेश हजारे यांनी महाराष्ट्र कामगार मंडळाने बंद केलेले साहित्य संमेलन परत पत्रव्यवहार करून चालू केल्याचे सांगितले.
यावेळी कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा भारती चव्हाण ,अॅड अनिरुद्ध सानप, भरत शिंदे, राजेश हजारे, आण्णा जोगदंड, तानाजी एकोंडे, संजय गोळे, संपत खैरे इत्यादी उपस्थित होते. अशोक सरतापे, ज्ञानेश्वर मलशेट्टी ,शंकर नाणेकर ,शिवाजी पाटील यांनी आयोजन केले. सूत्रसंचालन भरत भारी यांनी केले तर आभार शिवाजी पाटील यांनी मानले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.