पिंपरी-चिंचवड: मॉन्सूनकाळातील दुर्घटना रोखण्यास महापालिका सज्ज

माॅन्सून काळात रात्रीच्या वेळी शहरात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयनिहाय रात्रपाळीत आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यात आले असून नागरिकांनी रात्री घडणाऱ्या दुर्घटनांबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाकडे संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 11 Jun 2024
  • 11:28 am
pimpri chinchwad

संग्रहित छायाचित्र

रात्रीच्या वेळी दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेत चोवीस पथक तैनात, सर्व क्षेत्रीय कार्यालयात आपत्कालीन सेवा उपलब्ध  

विकास शिंदे :
माॅन्सून काळात रात्रीच्या वेळी शहरात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयनिहाय रात्रपाळीत आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यात आले असून नागरिकांनी रात्री घडणाऱ्या दुर्घटनांबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाकडे संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.  तसेच मान्सून काळात कोणत्याही परिस्थितीला हाताळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले संपर्क क्रमांक २४ तास सुरू ठेवावावेत आणि घटनास्थळी तातडीने दाखल होऊन परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळावी, अशा सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून यंदा सरासरी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याबाबतचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पर पडली, त्यावेळी त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, स्मार्टसिटी सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य अभियंता, रामदास तांबे, श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, संजय खाबडे, संजय कुलकर्णी, बाबासाहेब गलबले, प्रमोद ओंभासे, उप आयुक्त विठ्ठल जोशी, संदीप खोत, अण्णा बोदडे,  रविकिरण घोडके, नीलेश भदाणे,  विशेष अधिकारी किरण गायकवाड,   क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, डॉ. अंकुश जाधव, सीताराम बहुरे, अजिंक्य येळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, साहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, यशवंत डांगे, तानाजी नरळे, प्राचार्य शशिकांत पाटील, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे  यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या प्रवास करतात. या नद्यांच्या तिरावर मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. नद्यांच्या उगमाकडील भागात अतिवृष्टी झाल्यास शहरातील नदी तटावरील घरांमध्ये पाणी शिरण्याच्या शक्यता निर्माण होतात. तसेच जास्त पावसामुळे शहरात गटार, रस्ते, नाला अशा ठिकाणी पाणी तुंबणे, पाणी  घरात शिरणे, घराची पडझड होणे, वादळ वाऱ्यामुळे झाडे पडणे अशा दुर्घटना घडू शकतात. या दुर्घटनांचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून योग्य नियोजन करण्यात येत आहे.

त्यानुषंगाने सर्व क्षेत्रीय कार्यालयनिहाय  रात्रपाळीत आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यात आले आहेत. शहरात आपत्ती संदर्भात घटना घडल्यास संबंधित आपत्ती व्यवस्थापन पथकास तातडीने कळवावे, असे आयुक्त सिंह म्हणाले. तसेच महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल क्रमांक २४ तास सुरू ठेवावेत आणि तातडीने दुर्घटनास्थळी पोहचून परिस्थिती हाताळावी. क्षेत्रीय कार्यालायनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकामध्ये स्थापत्य विभागाचे कनिष्ट अभियंता (१), जलनिस्सारण विभागाचे कनिष्ट अभियंता (१), आरोग्य निरीक्षक (१), सफाई कामगार (२) आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest