Pimpri-Chinchwad: महापालिका पाहतेय अपघाताची वाट? ड्रेनेजचे चेंबर गायब, वाहनचालकांची कसरत; आयटियन्स, विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका

महापालिकेच्या वाकड बीआरटी रस्त्यावरील कस्पटे वस्ती चौकात रस्त्याच्या मधोमध चेंबर आहे. जगताप डेअरी ते वाकड मार्गावर कस्पटे वस्ती चौकाजवळ रहदारीच्या मार्गातील चेंबरचे झाकण गायब झाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 14 Oct 2024
  • 12:14 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

महापालिका पाहतेय अपघाताची वाट? ड्रेनेजचे चेंबर गायब, वाहनचालकांची कसरत; आयटियन्स, विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका

महापालिकेच्या वाकड बीआरटी रस्त्यावरील कस्पटे वस्ती चौकात रस्त्याच्या मधोमध चेंबर आहे. जगताप डेअरी ते वाकड मार्गावर कस्पटे वस्ती चौकाजवळ रहदारीच्या मार्गातील चेंबरचे झाकण गायब झाले आहे. त्यामुळे चेंबर उघडा असल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

सकाळच्या सत्रात शाळेच्या बस, हिंजवडीकडे जाणाऱ्या आयटियन्सची प्रचंड वर्दळ असते. याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाने चेंबरची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. पण, महापालिकेकडून दुरुस्ती न झाल्याने प्रशासन अपघाताची वाट पाहतेय का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

नाशिक फाटा ते वाकड महापालिकेचा बीआरटी मार्ग आहे. विशालनगर ते मानकर चौक या मार्गात कस्पटे चौकात स्मशानभूमीजवळ ड्रेनेजच्या चेंबरचे झाकण गायब झाले आहे. या मार्गावर दिवसरात्र वाहतूक सुरू असते. हिंजवडी एमआयडीसी, आयटी पार्ककडे जाणारे आयटियन्स हे परिसरातील कंपनीत काम करणारे कामगार मोठ्या प्रमाणावर पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, रहाटणी आदी परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांना कंपनी वेगवेगळ्या शिपमध्ये काम करावे लागते. त्यांना दिवसा व रात्री प्रवास करताना हा धोकादायक चेंबर दिसून न आल्यास अपघाताची शक्यता आहे. तसेच सकाळच्या सत्रात पालकांची धावपळ असते. 

आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालक जात असतात. मुलांच्या बसदेखील धावतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनाही रस्त्याने प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. परिणामी पायी जाणारे परिसरातील नागरिक आणि दुचाकी वाहनधारकांसाठी धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

पालिकेच्या जलनिस्सारण विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या खड्ड्यात पादचारी नागरिक आणि दुचाकीस्वार पडल्याच्या अनेक घटना घडल्याचे नागरिक सांगतात. एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का? असा संतप्त प्रश्न नागरिक करू लागले आहेत.

चेंबर दुरुस्तीची मागणी
चारचाकी वाहनांचेही चाक या खड्ड्यांमध्ये अडकून नुकसान होऊ शकते. एखादी मोठ्या दुर्घटना घडण्याच्या आधी महापालिकेच्या जलनिस्सारण विभागाने दुरवस्था झालेल्या चेंबरची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक व वाहनचालक करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story