संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड: महापालिका आस्थापनेवरील वर्ग एक ते चार गटातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या मार्च-एप्रिल महिन्यात करणे आवश्यक होते. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे बदल्या करण्यात आल्या नाहीत. परंतु, त्यानंतर महापालिकेतील बदलीसाठी पात्र असणाऱ्या ४३६ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार अशी चर्चा सुरू होती, पण महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आज-उद्या करत पाच महिने लोटले तरीही बदल्या केलेल्या नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्वतः आयुक्तच पाठिशी घालत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
महापालिकेच्या गट अ आणि ब मधील ३६ अधिकारी तर गट क मधील तब्बल ३२९ कर्मचारी आणि टेक्निकल संवर्गातील ७१ कर्मचारी हे बदलीसाठी पात्र झालेले आहेत. त्यामुळे महापालिकेत ४३६ अधिकारी-कर्मचारी बदलीसाठी पात्र आहेत. त्यांच्या बदलीसाठी महापालिका आयुक्तांनी ऑगस्टमध्ये अहवाल मागवून घेत सप्टेंबरमध्ये बदल्या करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, तब्बल पाच महिने उलटूनही आयुक्तांनी बदल्या केलेल्या नाहीत. येत्या चार-पाच दिवसांत विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या आधी बदलीस पात्र असणाऱ्यांच्या बदल्या होणार का ? केवळ बदलीचा फार्स केला जाणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी एकाच विभागात ६ वर्षांपासून अधिक काळ कार्यरत आहेत. प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लिपिक, साहाय्यक भांडारपाल, लेखापाल, उपलेखापाल या सारख्या पदांवर अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचारी आढळून येत आहेत.
आयुक्तांकडून बदली धोरणास हरताळ
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिका सेवेतील ‘वर्ग- अ’ ते ‘ड’पर्यंतच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात २०१५ मध्ये धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार एप्रिल व मे महिन्यात बदल्या करणे अपेक्षित असते. सहा वर्ष पूर्ण झालेल्यांच्या बदल्या होणे अपेक्षित आहे. पण, या धोरणाकडे दुर्लक्ष करून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणाला हरताळ फासला जात आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग एक ते वर्ग चारमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्यांच्या तातडीने बदल्या कराव्यात. या वर्षी मात्र ऑक्टोबर आला तरीही बदल्या केलेल्या नाहीत. प्रशासनाने दिलेली डेडलाइनही हुकली आहे, त्यामुळे मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ नयेत, याकरिता खासदार, आमदार हे आयुक्तांवर दबाव आणत असल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे. यामुळे आयुक्त हे राजकीय दबावाखाली बदल्यांचा निर्णय घेत नसल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
पालिकेतील बदलीस पात्र असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावाची फाईल तयार आहे. आचारसंहितेच्या आधी महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या लवकरच केल्या जातील. राजकीय दबाव वगैरे काही नाही.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.