संग्रहित छायाचित्र
भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली अर्बन स्ट्रीट उभारण्याचे नियोजन केले होते. यावर महापालिकेने तब्बल ४२ कोटींहून अधिक खर्च केला. मात्र, नागरिकांच्या कररूपी पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करूनही निकृष्ट दर्जाचे काम केले. हे काम पूर्ण न करता ते अर्धवट सोडले होते. या अर्धवट राहिलेल्या कामाच्या कठड्यातून बाहेर आलेले लोखंडी गज नागरिकांच्या जिवावर बेतले असून शुक्रवारी (२६ जुलै) एका निष्पाप नागरिकांचा जीव घेतला आहे.
दरम्यान, शहरात देखील अर्बन स्ट्रीट रस्त्यांची अनेक कामे सुरू आहेत. त्या रस्त्यावर पावसाचे पाणी देखील साचून राहात आहे. नेहरुनगरला अग्निशमनची वाहने देखील टर्न होत नाहीत. त्यामुळे अर्बन स्ट्रीट रस्ते खऱ्या अर्थाने नागरिकांच्या सोयीपेक्षा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीचा खेळ बनल्याचे दिसून येत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील रहदारी विचारात घेऊन रस्ते विकसित करण्यासाठी महापालिकेने सुरुवात केली आहे. महापालिकेने शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्स) विविध रस्ते विकसित केले जात आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ते, पादचारी मार्ग, सायकल स्वारांसाठी सायकल मार्ग, टू व्हीलर आणि फोर व्हीलरला पार्किंग स्पाॅट, आकर्षक पथदिवे, या सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध होतील, असा दावा महापालिकेचा केला आहे.
अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार महापालिकेने नागरिक व लहान मुलांसाठी शहरात ठिकठिकाणी सायकल ट्रॅक उभारण्यात येत आहे. पादचारी मार्ग देखील प्रशस्त बनवून आकर्षक केले जात आहेत. शहरात शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्स) पालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाकडून पुणे-मुंबई महामार्ग, टेल्को रोड ते बालाजीनगर, पवना ब्रिज ते डांगे चौक, डांगे चौक ते भूमकर चौक आणि शिवार चौक ते गोविंद गार्डन हॉटेल हे रस्ते ‘विकसित करण्यात येत आहेत. तर स्थापत्य विभागाने संत तुकारामनगर ते यशवंतनगर यासह अन्य काही रस्ते विकसित करायला घेतले आहेत. शहरातील अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार बनवलेल्या रस्त्यांना आता अतिक्रमणांचे ग्रहण लागले आहे. त्यातच भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील अर्धवट अर्बन स्ट्रीटचा लोखंडी गज छातीमध्ये घुसल्याने एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला. दीपक बवले (वय ५४) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भोसरीतील गव्हाणे वस्ती परिसरात राहणारे बवले हे शुक्रवारी रात्री आठ वाजता या अर्बन स्ट्रीट समोरील रस्त्याने जात होते. त्यांची गाडी मारुती शोरूम समोर घसरली. ते थेट या अर्धवट असलेल्या कठड्यांच्या बाहेर आलेल्या लोखंडी गजावर जाऊन पडले. हा लोखंडी गज बवले यांच्या छातीमध्ये आरपार घुसला. यामध्ये बवले हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी या लोखंडी गजांमुळे नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र आता हा अर्बन स्ट्रीट नागरिकांच्या जिवावर उठला असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.
शहरातील करदात्या नागरिकांच्या खिशातून एक, दोन नव्हे तर सुमारे ४२ कोटीहून अधिक रक्कम या अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली खर्च करण्यात आली. मात्र आता हाच अर्बन स्ट्रीट नागरिकांच्या जिवावर उठला आहे. त्या रस्त्यावर करोडो रुपये खर्च करूनही उड्डाणपुलाखाली रस्ता अपूर्ण राहिला आहे. त्यामुळे नेमके एवढे पैसे कोणी खाल्ले? असा सवाल देखील नागरिक विचारत आहेत.
अर्बन स्ट्रीट रस्त्यावर सुमारे ५६८ कोटींचा चुराडा
महापालिकेने शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्स) रस्ते विकसित केले जात आहेत. शहरातील काही प्रमुख रस्ते आणि पदपथावर सुमारे ५६८ कोटींचा चुराडा होणार आहे. मात्र, सध्यस्थितीत महापालिकेने विकसित केलेल्या रस्त्यांवर तब्बल २०० कोटींचा खर्च झाला आहे. तरीही रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. तर काही रस्ते खूपच छोटे होऊन फूटपाथ मोठे झाले आहेत. त्यामुळे रस्त्यालगतच्या मोठ्या व्यावसायिक यांसह हातगाडी, पथारी व्यावसायिकांना प्रशस्त फूटपाथ वापरण्यास मिळू लागले आहेत. तर काही व्यावसायिकांना पार्किंगची उत्तम व्यवस्था उपलब्ध झालेली आहे. यामुळे पालिकेने पादचारी नागरिकांना प्रशस्त फूटपाथवरून चालता यावे, हा उद्देश असफल होऊ लागला आहे
सायकल मार्गावर अडथळ्यांची शर्यत...
महापालिकेने शहरात रस्ते, पदपथ विकसित करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यासाठी सुस्थितीतील रस्ते तोडून नव्याने तयार केले जात आहेत. अधिक रुंदीचे पदपथ बनवून सायकल मार्गाची भर घातली जात आहे. मात्र, हे पदपथ, सायकल मार्ग एकसलग नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सांडपाणी वाहिनीचे झाकण, पदपथावरील झाडे, विजेचे खांब, बाके, कठडा, नामफलक असे अडथळे पार करीत ये-जा करताना पादचाऱ्यांसह सायकलस्वारांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
रस्त्याची रुंदी झाली कमी
पुणे-मुंबई महामार्ग, टेल्को रोड ते बालाजीनगर, पवना ब्रिज ते डांगे चौक, डांगे चौक ते भूमकर चौक आणि शिवार चौक ते गोविंद गार्डन हॉटेल या पाच रस्त्यांवर अर्बन स्ट्रीट अंतर्गत पदपथ विकसित आणि सुशोभीकरण करण्यात येत आहे. पुणे-मुंबई महामार्ग बीआरटीमुळे अरुंद झाला आहे. पायी चालणाऱ्यांची संख्या वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. रस्ते अर्बन स्ट्रीटनुसार विकसित झाल्यानंतर रस्त्याची रुंदी आणखी कमी होऊन वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
पदपथावर वाढले अतिक्रमण
शहरात पथ धोरणांतर्गत रस्ते विकसित करताना रस्ते रुंद आणि फूटपाथ प्रशस्त केले जात आहेत. त्यामुळे पादचा-यांपेक्षा छोट्या - मोठ्या व्यावसायिकांना अधिक फायदा होऊ लागला आहे. अनेक पदपथांवर दुकानदार, विक्रेते, वाहनचालक अतिक्रमण करत आहेत. दुकानदार साहित्य पदपथावर मांडतात. वाहने थेट पदपथावरच पार्क केलेली दिसून येत आहेत. हातगाडी, पथारीवाले टेबल, खुर्च्या मांडूनच व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे हा खर्च नेमका कोणासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील अर्बन स्ट्रीटच्या अर्धवट स्थितीतील कामामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी अनेकदा प्रशासनाला सांगूनही कामे अर्धवट राहिले आहे. यामुळे भोसरीतील एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेला कामात कुचराई करणारे ठेकेदार आणि अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
- अजित गव्हाणे, माजी सभापती, स्थायी समिती, महापालिका