संग्रहित छायाचित्र
वर्षाविहारासाठी लोणावळ्यात आलेले अन्सारी कुटुंबीय भुशी धरणात बुडाल्याने आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोणावळासह मावळ आणि सिंहगड भागात संध्याकाळी सहानंतर पर्यटकांसाठी संचारबंदी करण्याचे आदेश दिले आहेत.
लोणावळा परिसरातील भुशी धरणात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. आता लोणावळा परिसरातील पर्यटन स्थळांवर सायंकाळी सहा नंतर थांबता येणार नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अन्यथा मी तुमच्यावर कारवाई करणार, अशी तंबीच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना दिली आहे.
भुशी धरण परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जण रविवारी (३० जून) दुपारी वाहून गेले. त्यातील तिघांचा मृतदेह रविवारी आढळून आला होता. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा राबविलेल्या शोधकार्यात अन्य दोघांचे मृतदेह सापडले. त्याच बरोबर दुसऱ्या दिवशी ताम्हिणी येथील धबधब्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणाची राज्य स्तरावर गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून देखील या प्रकरणावर लक्ष ठेवले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना पर्यटन स्थळांवर निर्बंध घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आता लोणावळा परिसरातील भुशी, पवना, कार्ला, लोहगड तसेच सिंहगड, ताम्हिणी या पर्यटन स्थळांवर सायंकाळी सहा नंतर बंदी घालण्यात आली आहे. नियमांच्या चौकटीत राहून नागरिकांनी पाऊस आणि निसर्गाचा आनंद घ्यावा. हुल्लडबाजी, अतातायीपणा केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
जे अधिकारी हुल्लडबाजांवर कारवाई करणार नाहीत, अशा अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कारवाई करणार असल्याची तंबी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पर्यटनाच्या नावाखाली केवळ हुल्लडबाजी करणाऱ्यांवर प्रशासन कठोर कारवाई करणार आहे.
तसेच आवश्यक त्या भागासाठी स्वतंत्र उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने लोणावळा भागासाठी विशेष आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून पारित केले जाणार आहे.
या भागासाठी निर्बंध लागू
लोणावळा परिसरातील भुशी, पवना, कार्ला, लोहगड तसेच सिंहगड, ताम्हिणी या पर्यटन स्थळांवर सायंकाळी सहा नंतर बंदी घालण्यात आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.