संग्रहित छायाचित्र
राज्य महामार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगाराची आहे, त्या आगारप्रमुखांचा, स्थानकप्रमुखांचा आणि कार्यशाळा अधीक्षकांचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध केले होते. मात्र त्या आदेशाची दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. कारण, अवघ्या पाच ते सहा एसटीला हे फलक दिसून आले तर इतर एसटीमधील हे फलक गायब होते. त्यामुळे एकीकडे प्रवाशांची गैरसोय होत असताना, दुसरीकडे प्रशासनाच्या सूचनेला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी आदेश देऊनही अनेक बसमध्ये अजूनही नंबर प्रसिद्ध केले नाहीत. तर अनेक बसमधील नंबर असलेले स्टिकर्स फाडून टाकल्याचे दिसून आले. त्यामुळे या योजनेचा घाट प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी की उधळपट्टीसाठी होता? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विचार केला असता, पिंपरी आगरात जवळपास ५६ वाहने आहेत. मात्र त्यापैकी अगदी पाच ते सात बसमध्येच हे फलक दिसून आले. आगारात राज्यातील मराठवाडा, खान्देश आणि इतर ठिकाणाहून आलेल्या १२ एसटी बसची पाहणी केली. यात आगारप्रमुख, स्थानकप्रमुखांचा आणि कार्यशाळा अधीक्षकांचा दूरध्वनी क्रमांक असलेले फलक लावण्यात आले नव्हते. काही फलक फाडलेले दिसून आले.
एसटी प्रवासात चालक अतिवेगाने गाडी चालवत आहेत. अशा अनेक तक्रारी प्रवाशांना थेट आगारप्रमुखांना फोन करून सांगता याव्यात म्हणून आगारप्रमुखांचा, स्थानकप्रमुखांचा नंबर प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र चालक आणि वाहकांची तक्रार होत असल्याने स्टिकर्स फाडण्यात त्यांचा तर हात नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे. त्यातच प्रवाशांना आणखी या उपक्रमाची माहिती पोहोचू शकली नाही. ही माहिती प्रवाशांमध्ये पोहोचू नये, यासाठीच हे नंबर काढलेले दिसून आले. १५ दिवसांतच अनेक बसमधील नंबर असलेले फलक फाडून टाकल्याचे दिसून आले आहे.
प्रवाशांना विविध समस्या
महामंडळाच्या वतीने धावणारी शिवनेरी, शिवशाही या बसमध्ये चार्जिंग पॉईंट खराब झाले आहेत. बसमध्ये अस्वच्छता असल्याने प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होतो. लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे प्रवासी या बसेसला प्राधान्य देतात. मात्र, अनेकदा एसी चालत नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. पिंपरी चिंचवड विभागामध्ये १५ शिवशाही धावतात. मात्र अनेक बसमध्ये चार्जिंग पॉईंट आणि एसी बंद अवस्थेत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.