भाम येथील रोजगार मेळाव्यात युवक युवतींना रोजगाराची संधी
बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जाळं असलेल्या चाकण औद्योगिक वसाहत उशाला असतानाही खेड तालुक्यात बेरोजगारी आ वासून उभी आहे. रोजगारासाठी धावाधाव करणा-या या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी मी सेवेकरी सोशल फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रोजगार मेळावा घेण्यात आला. भाम येथील साई कृपा मंगल कार्यालयात रविवारी ७ जुलै सुधीर मुंगसे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
या मेळाव्यात सहभाग नोंदविलेल्या १४७८ युवकांपैकी बहुतांश युवक युवतींची ३५ कंपनीच्या प्रतिनिधिंमार्फत मुलाखतीद्वारे निवड झाली. तसेच या युवक-युवतींना राज्यातील विविध नामांकित कंपन्यांमधून ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ची रोजगार संधी उपलब्ध झाली.
मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, खेड तालुका अध्यक्ष हिरामण सातकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक खांडेभराड, मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सुधीर मुंगसे, माजी उपसभापती सतीश राक्षे, महिला तालुकाध्यक्षा मनिषा सांडभोर, युवक तालुकाध्यक्ष ॲड. विशाल झरेकर, बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे आदी उपस्थित होते. दरम्यान, रोजगार मेळाव्यासाठी भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, बाजार समितीचे संचालक विजयसिंह शिंदे, आदींनी भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक सुधीर मुंगसे यांनी केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.