पिंपरी चिंचवड: आमदार पात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी येथे निषेध व्यक्त केला. याप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri Chinchwad News)
संजोग वाघेरे, सचिन भोसले, रोमी संधू, राजाराम कुदळे, गणेश आहेर, चेतन पवार, संतोष म्हात्रे, संतोष वाघेरे, आबा नखाते, दस्तगीर मणियार या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना (Shivsena) पक्षातील एका गटाने बंड करत भाजपसोबत हात मिळवणी केली आणि सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर शिवसेना पक्ष, पक्षाचे चिन्ह आणि आमदारांची आमदारकी याबाबत मोठा वाद निर्माण झाला. आमदारांच्या पात्रतेबाबतचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आले होते. त्यावर बराच काळ लोटल्यानंतर बुधवारी (१० जानेवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला.
विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल मान्य नसल्याने या निकालाचा आणि राहुल नार्वेकर यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुधवारी रात्री पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात एकत्र जमले. या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, ठाकरे गटाचे आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आले. या आंदोलनासाठी पदाधिकाऱ्यांनी पोलीस परवानगी घेतली नसल्याचे कारण देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.