संग्रहित छायाचित्र....
नवी दिल्ली : भारताचा धडाकेबाज आणि लढवय्या फलंदाज युवराज सिंग याचे करियर संपण्यात विराट कोहली याचा मोठा हात आहे. त्याने युवराजसोबत अनेक चुकीच्या गोष्टी केल्या, असा गंभीर आरोप भारताचा माजी सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पा याने केला आहे.
विराट कोहली याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीबद्दल बोलताना उथप्पाने परखड मत मांडले आहे. युवराज भारतीय संघातून वगळला जाण्यासाठी विराटच जबाबदार आहे, असे उथप्पा म्हणाला. कॅन्सरशी झुंज देऊन मैदानात परतलेल्या युवराजला विराटने कुठलीही सवलत दिली नाही, असे उथप्पा म्हणाला.
युवराजने कॅन्सरला पराभूत केले आणि तो आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत होता. भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्यांपैकी तो एक खेळाडू आहे. त्या विजयामध्ये युवराजने महत्त्वाची भूमिका बजावली. अशा खेळाडूबद्दल तुमचा दृष्टिकोन कसा असायला हवा? विराटने त्याला संघर्ष करताना पाहिले होते. तरीही कर्णधार होताच त्याने युवराजच्या उणिवा काढल्या. त्याच्या फुफ्फुसाची क्षमता कमी झाली आहे असे विराट म्हणाल्याचे उथप्पा याने सांगितले.
खेळाचा दर्जा राखला जायला हवा. मात्र नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणता येते. हा एक माणूस सलवत मिळवण्यास पात्र होता. त्याने केवळ तुम्हाला स्पर्धा जिंकून दिली नाही तर, कर्करोगावरही मात केली आहे. या अर्थाने त्याने आयुष्यातील खडतर आव्हान पेलले आहे, असे उथप्पा म्हणाला.
विराटने युवराजला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही आणि फिटनेस चाचणीत कोणतीही सूट दिली नाही. कसोटीसाठी युवराजने फिटनेस चाचणीची पातळी दोन गुणांनी कमी करण्यास सांगितले होते. परंतु कोहलीने नकार दिला. विराटने सवलत न देताही युवराज फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाला, संघात आला, पण स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला नाही, म्हणून पुन्हा वगळला गेला. त्यानंतर त्याचा समावेश कधीच झाला नाही. त्यावेळी निर्णय प्रक्रियेत असलेल्यांनी त्याला संधी दिली नाही. विराट त्यावेळी कर्णधार होता आणि त्याचा शब्द चालत असल्याने सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे घडले, असेही उथप्पा म्हणाला.