राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची पोलीसाला मारहाण
पुण्यातील कासूर्डी टोलनाका येथे पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद करत होते. त्यावेळी दौंड येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी वंदना मोहिते यांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालती. तसेच एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी यवत पोलिसांनी वंदना मोहिते यांना गुरुवारी रात्री उशिरा राहत्या घरातून अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड येथील पदाधिकारी वंदना मोहिते या राष्ट्रवादीच्या बारामती लोकसभा डॉक्टर सेलच्या अध्यक्ष आहेत. १५ जून रोजी आषाढी वारीनिमित्त कासुर्डी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता. या मार्गावरून पुणे शहराकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. पोलीस नाईक नितीन कोहक हे त्या ठिकाणी कर्तव्य बजावत होते.
यावेळी वंदना मोहिते यांनी पोलीसांशी हुज्जत घातली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स बाजूला काढून शासकीय कामात अडथळा आणला. या घटनेनंतर यवत पोलीस ठाण्यात वंदना मोहिते यांच्याविरोधात कलम ३५३, ३२३, ३३२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानतंर पोलिसांनी मोहिते यांना त्यांच्या घरातून रात्री उशिरा अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास यवत पोलीस करत आहेत.