पुण्यात शरद पवारांच्या समर्थनार्थ झळकले फ्लेक्स
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा राजकीय भूकंप झाला. रविवारी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांना पक्षाचा पाठींबा नसल्याची भुमिका जाहीर केली. यानंतर पुण्यात कार्यकर्त्यांना शरद पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे. आम्ही शरद पवारसाहेबांसोबतच आहोत, अशा मजकूराचे बॅनर पुण्यात लावण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावरून राज्यातील कार्यकर्ते संभ्रमात आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश गुनाणी आणि समीर उत्तरकर यांनी फ्लेक्स लावले आहेत. पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. "मी शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांच्या सोबत", “वाट आहे संघर्षाची म्हणून कोण थांबणार?” “सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा”, असा मजकूर या फ्लेक्सवरती छापण्यात आला आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधीनंतर पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी निघाले आहेत. त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार, खासदार वंदना चव्हाण, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आहेत. देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो,एकच साहेब पवार साहेब, आम्ही पवार साहेबांसोबत अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या.