शरद पवारही सत्तेत जाणार? अजित पवार गटाच्या कार्यक्रमात पुन्हा झळकले फोटो
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी भूकंप झाला होता. शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेत अजित पवार यांनी नवीन वाट धरली. अजित पवार शिवसेना-भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत. मात्र, दोन गट असतानाही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटपाच्या कार्यक्रमात शरद पवारांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवारही सरकारमध्ये सामिल होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गट पुण्यासह राज्यात आपले संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी अजित पवार गटाने रणनिती तयार केली आहे. या रणनितीचा एक भाग म्हणून शनिवारी पक्षातील कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. शरद पवार यांच्या गटापेक्षा आपला गट मजबूत करण्यासाठी आतापासूनच पक्ष बांधणी अजित पवार करणार आहेत. पुणे हे दोन्ही नेत्यांचा होमटाऊन आहे. यामुळे या ठिकाणी आपले वर्चस्व असावे, असा प्रयत्न अजित पवार आणि शरद पवार दोन्ही करणार आहे.
पुण्यातील हॉटेल सेंट्रल पार्क येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले. या कार्यक्रमात पुणे शहर कार्यकारणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात येत आहेत. सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमात लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो दिसून येत आहेत. त्यामुळे शरद पवार देखील भाजप सोबत सत्तेत जाणार का ? राष्ट्रवादीचे दोन वेगळे गट नसून एकच गट आहे का ? असे प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहेत.