अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्तपदांचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार - हसन मुश्रीफ
आयुर्वेद आणि ऍलोपथी यांसारख्या विविध वैद्यकीय शाखांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारमध्येही स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
आयुर्वेद टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान नाशिक यांच्यातर्फे शिवदर्शन येथील राजीव गांधी ई लर्निंग स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला शिक्षक आमदार जयंत आसगावकर, संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष डॉ. नितीन चांदुरकर, बडोदा पारुल विद्यापीठाचे आयुर्वेद विभाग अधिष्ठाता डॉ. हेमंत तोशीखाने, डॉ आनंद मादगुंडी डॉ. नितीन वाघमारे, डॉ. संदीप जाधव, डॉ क्षितिजा शिंदे, डॉ सचिन चंडालिया, डॉ. प्रदीप कुमार जोंधळे, डॉ दत्तात्रय लोधे, डॉ अरुण दुधमल आदी यावेळी उपस्थित होते. आयुर्वेद क्षेत्रातील भरीव योगदानासाठी डॉ. गोविंद उपाध्याय आणि डॉ. भालचंद्र भागवत यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यामध्ये असणाऱ्या सहा शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि १६ अनुदानित महाविद्यालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांची पदे रिक्त होती. शासकीय महाविद्यालयांमधील ९० टक्के पदे एमपीएससी च्या माध्यमातूनही भरण्यात आली आहेत. तसेच अनुदानित महाविद्यालयांमध्ये पदे भरण्यासंदर्भातील प्रश्न हा न्यायालयांमध्ये प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी या विभागाचा मंत्री म्हणून मध्यस्थी करण्यासाठी मी तयार आहे. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आयुर्वेद शिक्षकांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.
जयंत आसगावकर म्हणाले, कोरोना काळामध्ये आयुर्वेदाचे महत्त्व सर्व जगाला कळले आहे. पूर्णतः आयुर्वेदाला वाहून घेणारी तरुण पिढी निर्माण केली पाहिजे. आयुर्वेदाचा विविध माध्यमातून प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. मी गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक अधिवेशनामध्ये आयुर्वेदाच्या संदर्भात असणारे प्रश्न मांडत आहे.
हेमंत तोशीखाने म्हणाले, आयुर्वेद शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी ही संघटना प्रयत्नशील आहे. त्याबरोबरच आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यातही ही संघटना पुढाकार घेत आहे. अशा प्रकारच्या संघटनांची पूर्ण देशामध्ये गरज आहे. आयुर्वेदिक शिक्षणासाठी यापुढे आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तरुणांना अधिकाधिक आयुर्वेद शिक्षणाकडे वळविले पाहिजे.
डॉ. राहुल सूर्यवंशी म्हणाले, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारमध्येही आयुष मंत्रालय सुरू करण्याची गरज आहे. राज्याच्या विविध आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये सहाशे शिक्षकांच्या पदे रिक्त आहेत ही पदे लवकरात लवकर भरली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.आयुर्वेदाचे केंद्रीय चिकित्सा व संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये होणे गरजेचे आहे.