राज ठाकरे
लोकांचा राग मतपेटीत बदलत नाही, तोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजणार नाही, असा संताप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केला. राज ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज ठाकरे म्हणाले, “खड्डे काही आताच पडलेले नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांवर खड्डे पडत आहेत आणि लोक या खड्ड्यांमधूनच प्रवास करत आहे. उलट मला जनतेचेच आता जास्त आश्चर्य वाटत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभरात आंदोलने सुरू केली आहेत. मात्र, मनसेने आतापर्यंत अनेक विषयांवर आंदोलन केले. तरीही पदरात काय पडले? अशी खंत व्यक्त करत राज ठाकरे म्हणाले, लोक ज्या उमेदवारांना आपला प्रतिनिधी म्हणून निवडून देत आहेत, ते प्रतिनिधीच रस्त्यांवरील खड्ड्यांसारखे प्रश्न उभे करत आहेत. तरीही जनता जातीच्या, धर्माच्या नावावरून त्यांनाच मतदान करत आहे.”
पुढे राज ठाकरे म्हणाले की, “जे लोकप्रतिनिधी नुकसान करतात जनता त्यांनाच निवडून देते. मला याचच जास्त आश्चर्य वाटते. असो, आता खड्ड्यांवरून सर्व ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सरकारचे डोळे उघडतील, अशी आशा आहे. मी कार्यकर्त्यांना सांगितले आहे की, सर्वच ठिकाणी काही तोडफोड करण्याची गरज नाही. मात्र, आंदोलन करताना लोकांना त्रास होणार नाही, एवढी काळजी घ्या.”
“देशात आता कायदा नावाची गोष्टच राहीलेली नाही, असे वाटते. निवडणुका केव्हा होणार? तर सत्ताधाऱ्यांना वाटेल तेव्हा होणार, अशी स्थिती आहे. तरीही पत्रकार सत्ताधाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारताना दिसत नाही. निवडणुकांचा मुद्दा न्यायालयात असल्याने निवडणुका होत नाहीत हे देखील खरे नाही. इतकी वर्षे हे प्रश्न नव्हते का? तेव्हा निवडणुका होत नव्हत्या का? हे सर्व प्रश्न आताच आले का?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला.