इंदापूरात केंद्रीय मंत्र्याच्या कार्यक्रमात स्थानिक नेत्यांना डावलले, सुप्रिया सुळेंचा संताप

स्थानिक लोकप्रतिनिधिंना डावलून हा कार्यक्रम फक्त भाजपाचा राजकीय कार्यक्रम असावा यापद्धतीने पार पाडण्यात आला, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 6 Jun 2023
  • 04:16 pm
Supriya Sule : इंदापूरात केंद्रीय मंत्र्याच्या कार्यक्रमात स्थानिक नेत्यांना डावलले, सुप्रिया सुळेंचा संताप

सुप्रिया सुळे

नियमानुसार स्थानिक नेत्यांना आमंत्रण द्यायला हवे होते – सुप्रिया सुळे

केंद्रीय जलशक्ती व अन्नप्रक्रिया राज्यमंत्री प्रल्हादजी पटेल यांच्या हस्ते सोमवारी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे केंद्र सरकारच्या 'जल जीवन मिशन' या शासकीय कार्यक्रमाचे भूमीपुजन आणि उद्घाटन पार पडले. मात्र, या कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधिंना डावलून हा कार्यक्रम फक्त भाजपाचा राजकीय कार्यक्रम असावा यापद्धतीने पार पाडण्यात आला, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत ट्वीट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रल्हादजी सोमवारी इंदापूर येथे केंद्र सरकारच्या 'जल जीवन मिशन' या शासकीय कार्यक्रमाच्या भूमीपुजन आणि उद्घाटनासाठी आले होते. शासकीय कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री आल्यास तेथे स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रण देणे हा प्रोटोकॉल आहे. कारण शासकीय कार्यक्रम हा जनतेचा असतो, कुण्या एका पक्षाचा असत नाही. परंतु तसे झाले नाही.

महत्वाची नमूद करण्याची बाब अशी की, 'जल जीवन मिशन'च्या अंतर्गत आपल्या मतदारसंघात कामे व्हावी, यासाठी माझ्यासह इंदापूरचे आमदार व माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आवश्यक त्या पातळ्यांवर उचित पाठपुरावा केला होता. यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला, ही वस्तुस्थिती आहे.

शासकीय कार्यक्रमात राजकीय हेवेदावे, पक्षीय मतभेद, मनभेद आदी दूर ठेवायचे असतात. परंतु या संकेताला पुर्णतः हरताळ फासून व स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलून हा कार्यक्रम फक्त भाजपचा राजकीय कार्यक्रम असावा, यापद्धतीने पार पाडण्यात आला. हे अतिशय संकुचित मनोवृत्तीचे लक्षण आहे. या मनोवृत्तीचा निषेध, अशा शब्दात त्यांनी ट्वीटरवरून संताप व्यक्त केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest