शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे : उपमुख्यमंत्री अजित पवार

विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत; शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्यसंपन्न पिढी घडविणे ही काळाची गरज असून शिक्षक आणि पालकांनी यासाठी योगदान द्यावे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 9 Sep 2023
  • 03:27 pm
Ajit Pawar

Ajit Pawar : शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे : उपमुख्यमंत्री

पुणे : विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत; शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्यसंपन्न पिढी घडविणे ही काळाची गरज असून शिक्षक आणि पालकांनी यासाठी योगदान द्यावे. तसेच विद्यार्थ्यांनी नव्या काळातील आव्हाने ओळखून पारंपरिक विचार न करता नवे आणि आवडीचे क्षेत्र निवडावे,असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. अल्पबचत भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमात  ते बोलत होते. 

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. शिक्षकांनी चांगली कामगिरी करत विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करावे. गरीब कुटुंबापर्यंत चांगले आणि दर्जेदार शिक्षण पोहीचविण्याची जबाबदारी शिक्षकांची असून शिक्षकांनी त्यासाठी विशेष प्रयत्न करावे.   विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा उत्तमरीतीने शिकविता यावी यासाठी ती भाषा आत्मसात करावी आणि चांगले उपक्रम राबवावे. कौशल्याचे आणि नैतिकतेचे शिक्षण देऊन विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत आणि चारित्र्यसंपन्न व्हावा यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन देशाचा नावलौकिक उंचवावा. यशाची शिखरे गाठताना शाळेला किंवा शिक्षकांना विसरू नये. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करताना चांगले मित्र निवडावे. नैतिकतेचा विसर पडू देऊ नये आणि नियमित व्यायाम करावा. व्यसनापासून दूर रहात आवडते छंद जोपासावे. आपल्या उत्तम कामगिरीत सातत्य राखत शाळेचा आणि देशाचा नावलौकिक उंचवावा, असा संदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.

राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजी भाषेतूनही शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे. मातृभाषा महत्वाची असून जागतिक संवादाची भाषा म्हणून इंग्रजीलाही महत्व देण्याची गरज आहे. त्यासाठीही शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे, असेही पवार म्हणाले. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी व्हावे यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest