मणिपूरतील हिंसाचाराचा झोपडीवासियांकडून तीव्र निषेध
मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि तेथील महिलांची काढण्यात आलेली नग्न धिंड या घटनांचा आज पुण्यातील झोपडीवासी नागरिकांनी निषेध नोंदवण्यात आला आहे. पुण्यातील आप्पा बळवंत चौकात डोळ्यावर पट्टी बांधून आणि हातात तराजू घेऊन शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून निषेध नोंदवण्यात आला आहे.
मणिपुरात इतका भयानक हिंसा सुरू असताना देशातील सरकार आणि पोलीस तसेच इतर महत्त्वाच्या यंत्रणा त्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. न्याय देवता डोळ्यावर पट्टी बांधून असते, असे म्हणतात. सरकारही याबाबतीत त्याच भूमिकेत गेलेले दिसते आहे. मणिपुरातील घटनांनी संपूर्ण जगात देशाची मानहानी झाली आहे. परंतु तरीही या सरकारला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही, ही बाब केवळ निंदनीयच नव्हे तर धक्कादायक आहे. देशातल्या नागरिकांना आता हवालदील वाटू लागले आहे. नागरिकांचा हा रोष व्यक्त करण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने ही निदर्शने आयोजित करण्यात आली होती.
त्यात झोपडीवासीय महिलांची संख्याही लक्षणीय होती. या निदर्शनाचे नेतृत्व झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या जिल्हा अध्यक्ष सुनिता अडसूळ यांनी केले. यावेळी निदर्शक डोळ्यावर पट्टी बांधून आणि हातात तराजू घेऊन सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सहभागी झाले होते. मणिपूर मधील संकटग्रस्त महिला आणि बालकांच्या प्रती निदर्शकांनी सहानुभूती व्यक्त केली.
यावेळी सुनिता अडसुळे, प्रा. रतनलाल सोनाग्रा, अरुण तांगडे, सुरेखा भालेराव, वंदना पवार, वैशाली अवघडे, नीलम सोनवणे, दत्ता कांबळे, महमद शेख, काशीनाथ गायकवाड, राम परिहार, सुनील भिसे, संजय भंडे, गोरोबा पारधे, संतोष पिल्ले, नितीन वने, गणेश लांडगे, प्रदीप पवार, आबासाहेब शिंदे, आबा चव्हाण आदी सहभागी झाले होते.