“पंतप्रधान मोदींनी पुण्याऐवजी मणिपूरला जावे” - आमदार धंगेकर
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे शहरात कार्यक्रमासाठी येत आहेत. पण मागील तीन महिन्यांपासून मणिपूर राज्य जळत आहे. तेथील महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यावर आजपर्यंत पंतप्रधान मोदी यांनी कोणत्याही प्रकारची भूमिका मांडली नाही किंवा त्या ठिकाणी गेले नाही. तर ते देशातील अनेक भागांत उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जात आहेत. ही निषेधार्थ बाब असून पंतप्रधानांनी पुण्यातील कार्यक्रमाला येण्यापेक्षा मणिपूर येथे जाऊन जनतेला न्याय देण्याच काम करावे”, असा सल्ला काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी दिली आहे. मात्र, आंदोलनादरम्यान धंगेकरांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
मोदींच्या पुणे दौऱ्यावेळी आंदोलन करण्यात येऊ, यासाठी पुणे पोलीसांकडून अनेकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र तरी देखील विरोध आंदोलनावर ठाम आहेत. काळे झेंडे आणि घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून कऱण्यात येत आहे. त्यामुळे पुणे पोलीसांकडून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत आहे. यावेळी मोहन जोशी, आमदार रविंद्र धंगेकर यांच्यासह अनेकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
धंगेकर म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर असून अनेकांना पडत्या काळात शरद पवार यांनी साथ दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी शरद पवार यांनी मदत केली होती. नरेंद्र मोदी यांना पुरस्कार दिल्यानंतर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल या भावनेतून शरद पवार पुरस्कार सोहळ्यास जात आहेत.”