Chandrakant Patil : महाराष्ट्र गोसेवा आयोगाला सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून मदत करणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : महाराष्ट्र गोसेवा आयोगाला सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
पालकमंत्री पाटील यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, समाजापर्यंत गाईचे महत्व पोहोचविणे, त्यांचा वंश पूर्णपणे वाढविणे अशा विविध बाबींसाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आयोगाच्या माध्यमातून देशी गाईचे संगोपन, संवर्धन, संरक्षण, गोशाळा तसेच दूध, गोमूत्र आणि शेणापासून विविध उत्पादन करण्यात येणार आहे. गाईच्या दुधाबरोबरच आरोग्याच्यादृष्टीने गोमूत्र आणि पर्यावरणाच्यादृष्टीने शेणाचे महत्व वाढलेले आहे. त्यामुळे आगामी काळात जागतिक पातळीवरील मागणी लक्षात घेता त्यादृष्टीने उत्पादन केल्यास निश्चित फायदा होईल. येत्या काळात गोपालकांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल.
गोसेवा आयोगासाठी राज्य शासनाच्यावतीने निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून निधी गोळा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्यात पावसाने मोठ्या प्रमाणात ओढ दिल्यामुळे जनावरांना मोठ्या प्रमाणात चारा लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात आयोग आणि पशुसंवर्धन विभागाचे असे जिल्हानिहाय दोन चारा केंद्र उभे करावे, यासाठी मोठ्या प्रमाणात सीएसआर निधीचा उपयोग करावा. दुष्काळामध्ये एकही जनावरे चाऱ्याशिवाय राहणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, असेही पाटील म्हणाले.