“खड्डे... भ्रष्टाचाराचे अड्डे”, पुण्यात मनसेचे खड्ड्यात झाडे लावा आंदोलन
पुण्यातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांना रस्त्यावर प्रवास करताना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे, मनसेने संपूर्ण पुणे शहरात महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन केले आहे.
पावसामुळे रस्त्यात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर प्रवास करताना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे, झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी औंध रोड येथील स्पाईसर कॉलेज समोरील रोड, तसेच परिहर चौक, कसबा पेठ, शिवाजीनगर यासह शहरातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी ज्या ठिकाणी खड्डे होते, त्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून प्रशासना विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.
“खड्डे... भ्रष्टाचाराचे अड्डे”, अशा मजकूराचे नाव फलक हातात घेत त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. यावेळी खड्ड्यांभोवती रांगोळी काढण्यात आली. हेच का ते सुंदर पुणे, अशा मजकूर देखील रांगोळीत काढण्यात आला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.