अजित पवार सत्तेत गेले याची पत्रकारांना चीड यायला हवी, राज ठाकरेंचा संताप
अजित पवार सत्तेत गेले याची पत्रकारांना चीड यायला हवी, पूर्वी असे काही घडले की पत्रकार फटकारुन काढायचे, सळो की पळो करायचे, पण आता असे काही घडत नाही. उगाच फडतूस ब्रेकिंग न्यूज चालवतात. काय तर राज ठाकरे घरातून निघाले. येथे पोहोचला, या काय बातम्या आहेत का? निर्भीड पत्रकारिता टिकली पाहिजे. पत्रकारितेतील वाईट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी एक परिसंवाद घ्या आणि त्यासाठी मला बोलवा, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांबाबत संताप व्यक्त केला.
राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, पिंपरी-चिंचवड एडिटर्स गिल्ड आयोजित पत्रकार हल्ला विरोधी कायदा परिषदेत पत्रकार हक्कासाठी लढणाऱ्या राज्यातील पत्रकारांचा गौरव कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लागली. यावेळी राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, “मार्मिक ते आजपर्यंतची पत्रकारिता मी स्वतः पाहत आलोय. व्यंगचित्रकार आणि पत्रकार हे एकच आहे. मी राजकारण आणि पत्रकारिता दोन्ही पाहत आलोय. त्यामुळे आज पत्रकारांवर होणारे हल्ले हे नक्कीच निषेधार्ह आहे.”
“पण ट्रोल वगैरे करणे, मुळात हे तुम्ही वाचताच कशाला. एकदा माझा कार्यक्रम, बोलणे संपले की मी पुन्हा कमेंट्स पाहत नाही. मग तुम्ही कशाला पाहता, हे मोबाईल म्हणजे रिकम्यांचा धंदा. घरी आले की बोटं आपटत बसायचे, राजकारण्यांनी तर यासाठी विशेष लोकं पाळलेली आहेत. त्यामुळे तुम्ही याकडे लक्ष देणे बंद करावे. ज्यांना ज्ञान नाही, त्यांना कशाला गांभीर्याने घ्यायचे”, असे राज ठाकरे म्हणाले.