राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची कोयता, कुऱ्हाडीने वार करून हत्या
जेजुरी नगरपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मेहबुब पानसरे यांच्यावर कोयता आणि कुऱ्हाडीने वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मेहबुब पानसरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. जमिनीच्या वादातून त्यांची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहबुब पानसरे हे जेजुरी नगरपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते आणि प्रसिद्ध व्यापारी म्हणूनही त्यांचा लौकिक होता. मौजे धालेवाडी गावाच्या हद्दीमध्ये पानसरे यांची जमीन आहे. शुक्रवारी सायंकाच्या सुमारास शेतीच्या मशामतीचे काम पाहण्यासाठी ते गेले होते. यावेळी चार ते पाच जणांनी मेहबुब पानसरे व इतर दोघांवर कोयता, कुऱ्हाडीने हल्ला केला.
या हल्ल्यात पानसरेंच्या मानेला आणि डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यांना तात्काळ पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मेहबुब पानसरे हे खंडोबा देवाचे मानकरी आणि निस्सिम भक्त होते सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते त्यांच्या पत्नीही माजी नगरसेविका आहेत जेजुरी रेल्वे स्टेशन परिसरातून ते निवडून येत होते. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचे ते निकटवर्तीय होते, अशीही माहिती समोर आली आहे.