मी खडकवासला मतदारसंघातून लढण्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली – रुपाली चाकणकर
“खडकवासला विधानसभा मतदारसंघात फिरत असताना शाळेचा विषय आहे, शिक्षक नाहीत, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसत आहेत. नालेसफाई अजून झालेली नाही. रस्त्यांच्या समस्या आहेत. एक-एक दिड-दिड रहदारीचे रस्ते बंद राहतात. या सगळ्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी मुख्य अधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी आज मी येथे हजेरी लावली आहे”, असे राज्य महिला आय़ोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. तसेच, “यावर्षी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, त्यासाठी याअगोदरच मी पक्षाकडे उमेदवारी माहितली आहे”, असे देखील रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
रुपाली चाकणकर यांनी आज पुणे महापालिकेतील हिरकणी कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत माध्यमांशी संवाद साधताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये अनेक पदावर काम केले आहे. तसेच ज्या लोकांनी तुम्हाला सांगितले की, मी दुसऱ्या पक्षातून इच्छुक आहे, त्यांची आणि माझी एकदा मला भेट घालून द्या, या गोष्टी तुमच्याकडूनच मला समजतात.”
पुढे बोलताना चाकणकर म्हणाल्या की, “महाराष्ट्रातल्या शासकीय आणि निमशासकीय प्रत्येक विभागात हिरकणी कक्ष असायलाच पाहिजे, असा आग्रह धरत आम्ही धरला होता. आज पुणे महापालिकेत हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. २०१६ साली हिरकणी कक्ष पुणे महापालिकेमध्ये सुरू करण्यात आला. मात्र, ५५० पेक्षा जास्त महिला आणि पुरुष कर्मचारी या मोठ्या महापालिकेत काम करत असताना हिरकणी कक्ष धुळखात पडला होता. काही दिवसांपुर्वी जेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्षा या नात्याने हिरकणी कक्षाची पाहणी करणार असल्याचे सांगितल्यावर या हिरकणी कक्षाची स्वच्छता करण्यात आली.”
महापालिका निवडणुकीवर बोलताना चाकणकर म्हणाल्या की, “गेले दीड वर्ष पुण्याला प्रशासन किंवा नगरसेवक नाही. त्याच्यावर निवडणुका होणे गरजेचे आहे. तसेच अनेक शाळांमध्ये शिक्षक नाहीत. शिक्षकेतर कर्मचारी नाहीत, अशावेळी प्रशासनाने या सर्व गोष्टींचा कसा पाठपुरवठा करायचा?” असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.