फकिराचा धगधगता प्रवास रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सर्वतोपरी साह्य करणार : चंद्रकांत पाटील
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तेल वात समिती व पुणे शहर जिल्हा मातंग समाज यांच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्ताने "फकीरा व इतर पुरस्कार वितरण समारंभ सावित्रीबाई फुले स्मारक, गंज पेठ या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी सिने अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना फकीरा पुरस्कार, यशवंत नडगम यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार, प्रतिभा नारी परिवर्तन संस्था यांना सामाजिक कार्याबद्दल गौरव समाज भूषण पुरस्कार पुण्याचे पालकमंत्री तसेच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश बागवे, आयोजक सुखदेव अडागळे मा. नगरसेवक अविनाश बागवे, रवी पाटोळे, दयानंद अडागळे, सुशिला नेटके, आनुसया चव्हाण, राहुल खुडे, सचिन जोगदंड व समाजातील सर्व प्रमुख कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक सुखदेव अडागळे प्रास्ताविक प्रसंगी म्हणाले की गेल्या ४० वर्षांपासून मी समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय आहे. यापुढे मी समाज हिताचे कार्यक्रम करणार असून मातंग समाजासाठी माझे विशेष प्रयत्न असतील.
प्रवीण तरडे यावेळी म्हणाले, की अण्णाभाऊंचा फकीरा पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मी गळ्यात जसा दागिना घालून मिरवतात तसा मी आयुष्यभर मिरवत राहीन. अण्णाभाऊंचे मी साहित्य वाचले आहे. भविष्यात मला जर संधी मिळाली तर अण्णाभाऊंच्या फकीरावरती एक रुपया माझे मानधन न घेता दर्जेदार चित्रपट निर्मिती करेन. फकीर हा पुरस्कार मी नतमस्तक होऊन त्याचा स्वीकार करतो.
पाटील म्हणाले की अण्णाभाऊंचं साहित्य आहे. महासागरासारखे विशाल असून अण्णाभाऊंनी त्यांच्या हयातीत अनेक कथा, कादंबऱ्या, पोवाडे यांची निर्मिती केली. अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव करत रशिया येथील मास्को येथे त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. अण्णाभाऊंच्या फकीरावरती भविष्यात चित्रपट निघाला तर अभिनेते प्रवीण तरडे यांना मी सर्वतोपरी प्रयत्न करेन आणि या कलाकृतीसाठी एक रुपया देखील कमी पडणार नाही याची मी काळजी घेईन.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. महेश सकट यांनी केले तर ॲड.श्रीराम कांबळे यांनी आभार मानले.