“एक सही संतापाची”, पुण्यात मनसेकडून आगळीवेगळी मोहिम
सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उलथापलथ होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सह्यांची आगळीवेगळी मोहिम राबवली जात आहे. मनसेचे आज (८ जुलै) आणि उद्या (९ जुलै) 'एक सही संतापची' हे अभियान राज्यभर सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरात एक सही संतापाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
राज्यात सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींचा विरोधात मनसेने आज आंदोलन छेडले आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील शनिपार चौकात घेण्यात आलेल्या एक सही संतापाच्या मोहिमेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कोणत्याही पक्षातील नेत्यांमध्ये पक्षनिष्ठा दिसून येत नाही, अशा शब्दात पुणेकर नागरिकांनी राजकीय नेत्यांना सुनावले.
सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेण्यात येत आहेत. तर एका भल्या मोठ्या फ्लेक्सवर सामान्य नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन राज्यातील या राजकारणाचा निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, एकमेकांवर खालच्या स्तरावर आरोप प्रत्यारोप करायचे आणि काही तासांत सत्तेसाठी त्यांच्याकडे जायचे. या सर्व घडामोडी पाहिल्यावर कोणत्याही पक्षातील नेत्यामध्ये पक्षनिष्ठा दिसून येत नाही, असा प्रश्न देखील पुणेकर यामाध्यमातून करत आहेत.