उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणे मेट्रोने प्रवास, प्रवाशांशी साधला संवाद
पुण्यातील चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे लोकार्पण आज होणार आहे. तसेच खेड बायपास, पुणे बायपास व एकलहरे मार्गांचे चौपदरीकरण याशिवाय, पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे’ मेट्रो कार्डचे लोकार्पण आज होणार आहे. यानिमित्ताने आज कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी रुबी हॉल ते वनाझ दरम्यान पुणे मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवासी नागरिकांशी संवाद साधला.
पुण्यातील एनडीए (चांदणी) चौकातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात येणार आहे. यानिमित्त पुणे दौऱ्यात गडकरी महत्त्वपूर्ण बैठकही घेणार आहेत. या बैठकीला आणि उद्घाटनाला नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राहणार आहेत.
या कार्यक्रमापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील प्रास्तावित मेट्रोसह दुमजली उड्डाणपुलाच्या कामाबाबत अजित पवार यांनी पुणे स्टेशन येथील विधान भवन येथे अधिकार्यांसोबत बैठक घेतली. त्या बैठकीनंतर चांदणी चौकातील कार्यक्रमाच्या ठिकाणी अजित पवार यांनी रुबी हॉल क्लिनिक ते वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यान अजित पवार यांनी नागरिकांशीदेखील संवाद साधला.