काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एकमेव लोकसभा खासदाराचे निधन !
काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे अल्पशा आजाराने निधन आहे. ते ४७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे ३.३० च्या सुमारास धानोरकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
याबाबत माहिती देताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे धानोरकरांवर उपचार सुरू होते. धानोरकर यांचे पार्थिव आज दुपारी वरोरा येथील त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे. बुधवारी वरोरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.
लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. २०१४ ते २०१९ दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार होते. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता. यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करुन खासदार झाले होते.