अरविंद शिंदे
“पुणे जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यातील एकमेव पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेस लढते, त्यामुळे पुण्यासाठी आमचा आग्रह कायम राहिल. त्यात कोणतीही तडजोड होणार नाही”, असे विधान काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे. लवकरच पुणे लोकसभा पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पुण्याचा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात यावा, अशी भूमिका राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडून घेण्यात येत आहे. मात्र, अरविंद शिंदे यांनी तडजोड होणार नाही असे विधान केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहेत.
प्रशांत जगताप यांच्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते आणि अजित पवार यांनी देखील ज्या जास्त ताकद, त्यांना तिथे उमेदवारी दिली जाईल, असे म्हटले होते. याबाबत अरविंद शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, “ज्या पक्षाला लढायचे असते, तो पक्ष शांत बसलेला असतो. ज्याला लढायचे नसते तो आरडाओरड करत असतो. आम्हाला आरडाओरड करण्याची गरज नाही.”
“पुण्यात राष्ट्रवादीचे ४० नगरसेवक निवडून आल्यामुळे जर प्रशांत जगताप बोलत असतील की राष्ट्रवादीचे ताकद पुण्यात जास्त आहे. तर त्यांनी मी सांगू इच्छितो की, हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जातो, तर खडकवासला हा बारामतीमध्ये जातो. राहिलेल्या ६ विधानसभा मतदारसंघात आपले की नगरसेवक आहेत. याची आकडेवारी प्रशांत जगताप यांनी काढावी. तसेच आमचे पराभूत नगरसेवक आहेत, त्यांच्याही मतदानाची आकडेवारी काढावी. त्यानंतर प्रशांत जगताप यांनी कळेल की, काँग्रेसची पुण्यात किती ताकद आहे”, असे प्रत्यूत्तर अरविंद शिंदे यांनी दिले आहे.