भुजबळांचे शरद पवारांबद्दल बेताल वक्तव्य, पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक
बीडच्या सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली. त्यामुळे भुजबळांना मोठ्या ट्रोलिंगला समोरे जावे लागत आहे, त्यांच्याविरोधात निषेध आंदोलन होत आहेत. पुण्यातील शनिपार चौक येथे देखील राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांकडून आक्रमक आंदोलन करण्यात आले आहे.
छगन भुजबळ यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान छगन भुजबळ यांच्या पोस्टरला जोडे मारत तसेच पायदळी तुडवत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
छगन भुजबळ हे कोणाचेच नव्हते, याआधी भाजपने त्यांना दोन वर्ष आतमध्ये टाकले होते. तेव्हा शरद पवार यांनी त्यांना बाहेर काढले आणि त्याचे पांग आता अशा पद्धतीने छगन भुजबळ फेडत आहेत. मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांची त्वरित हकलपट्टी व्हावी, अशी मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून केली आली आहे. त्यासोबतच छगन भुजबळ दिसतील तिकडे त्यांच्या अंगावर काळे फेकण्यात येईल, असा इशारा देखील या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.