राज्यात सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये निवडणुकांचे बिगुल वाजणार
सध्या राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथ होत आहेत. शिंदेंच्या बंडानंतर आता अजित पवार देखील सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीसोबत गेले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये पुणे, पिंपरी चिंचवडसह महाराष्ट्रातील महापालिकेच्या निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहे.
निवडणूक आयोगाने याबाबतचे परिपत्रक ५ जुलै रोजी काढले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आयोगाच्या राजपत्रात उल्लेख आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित करण्यात येत असल्याचा देखील पत्रात उल्लेख केला आहे.
राज्यात २३ महानगरपालिकांची मुदत संपली आहे. त्यांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. तसेच २५ जिल्हा परिषदा आणि २०७ नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदांच्या निवडणुका महत्वाच्या असतात. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांच्या निवडणुका होतात. तसेच राज्यातील ९२ नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा प्रलंबित आहे. या सर्व निवडणुकांची वाट स्थानिक पातळीवर पाहिली जात होती. आता निवडणूक आयोगाने राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुका घेण्याची संकेत दिले आहे.