अजित पवारांचे समर्थक बाबुराव चांदेरेंची रिक्षाचालकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थक बाबुराव चांदेरे यांनी रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. बाबुराव चांदेरे हे अजित पवार यांचे अंत्यत विश्वासू सहकारी तसेच पुणे महापालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक आहेत. सध्या बाबुराव चांदेरे यांनी रिक्षा चालकास मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अजित पवार सत्तेत येताच समर्थकांची दादागिरी सुरू झाली, अशी चर्चा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरू झाली आहे. मात्र, माझ्याकडून रिक्षा चालकास मारहाण झाली नसल्याची भूमिका या घटनेवर बाबुराव चांदेरे यांनी मांडली. चांदेरे म्हणाले की, सुस चौकात दुपारी जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.त्या ठिकाणी मी जवळपास तीन चार तास वाहतूक सुरळीत करण्याचे काम करित होतो. त्यावेळी एक रिक्षा चालक अचानक मध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होता.
“तुझ्यामुळे आणखी वाहतूक कोडी होईल. तू तुझी गाडी मागे घे, थोड थांब थोड्या वेळाने जा, असे त्याला सांगितले. त्यावर तो माझ्या सोबतच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच माझ्याकडून रिक्षा चालकास कोणत्याही प्रकाराची मारहाण झाली नाही”, अशी भूमिका चांदेरे यांनी मांडली आहे.