पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ ने मंगळवारी पुण्यात सन्मानित करण्यात आले आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. पुण्यातील सप महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी पुणेकर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी बोलताना दिपक टिळक म्हणाले की, “भारताच्या प्रगतीत अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार दिल्याने महान व्यक्तीचा सन्मान होतो आणि तरूणांसमोर आदर्श उभा राहतो. यंदाचा पुरस्कार कुणाला देण्यात यावा, यावर चर्चा करण्यासाठी सर्व विश्वस्त चर्चा करण्यासाठी बसले. तेव्हा आमच्यासमोर केवळ एकच नाव आले, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी”, असे यावेळी बोलताना टिळक म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जनतेच्या सेवेत कोणतीही कमतरता ठेवणार नाही. लोकमान्य टिळकांची छाप प्रत्येक ठिकाणी होती. टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची दिशा बदलली. भारतीय देश चालवू शकत नाही असं इंग्रज म्हणायचे. त्यावेळी टिळक म्हणाले, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे.”