पुण्यातील दहीहंडी उत्सवाला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्या, आमदार कांबळेंची मागणी
पुणे शहर व जिल्हा परिसरात साजरा होणाऱ्या दहीहंडी या पारंपरिक उसत्वाची वेळ रात्री १२ वाजेपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिलभाऊ कांबळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिले आहे.
आमदार कांबळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, “पुणे शहर व जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पारंपारिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यावर्षी देखील ०७ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागरिकांना उत्सवाचा आनंद घेता यावा या उद्देशाने दहीहंडी उत्सवाच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर केली होती. दहीहंडी उत्सव साजरा करीत असताना कार्यक्रमाची वेळ रात्री १० वाजेपर्यंत असते. परंतु ही वेळ खूप कमी पडते. कारण, दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी जवळपास महिनाभर सर्व कार्यकर्ते झटत असतात. मात्र, दहीहंडीच्या दिवशी सायंकाळी ७ ते रात्री १० असे तीनच तास कार्यक्रम साजरा करता येतो.”
“याशिवाय, पुणे शहर आणि उपनगरामध्ये उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई, बारामती यासह इतर भागातून गोविंदा पथके येतात. मात्र, या पथकांची संख्या कमी असल्यामुळे गोविंदा पथकांना प्रत्येक मंडळामध्ये पोहोचणे शक्य होत नाही. यामुळे बऱ्याच मंडळांना दहीहंडी ही खाली घेवून फोडावी लागते. गोविंदा पथक न पोहचल्यामुळे संबंधित उत्सवात जमलेल्या बालगोपाळ, नागरिक व कार्यकत्यांचा हिरमोड होतो. त्यामुळे कार्यक्रमाची वेळ रात्री १२ वाजेपर्यंत वाढविण्यात यावी, दहीहंडी उत्सव पुणेकरांना मोठ्या उत्साहात साजरा करता येईल”, असे आमदार कांबळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी पुणे शहर व जिल्हा दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे समन्वयक अॅड. राहुल म्हस्के पाटील, जालिंदर बाप्पू शिंदे आणि दिपक नागपुरे आदी उपस्थित होते.