अजित पवार आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते, पक्ष फुटला नाही; सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
आमचा पक्ष अजून एकच आहे. पक्ष फुटलेला नाही. एक गट सतेत्त आहे. तर एक गट विरोधी पक्षात आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत, असे विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. आज सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.
देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीची येत्या ३० ऑगस्ट आणि १ सप्टेबरला बैठक होणार आहे. पण या बैठकीच्या सहा दिवसआधी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. त्या म्हणाल्या की, राज्यात एक उपुख्यमंत्री भाजपचे आहेत. दुसरे कुठले आहेत? कुठल्या पक्षाचे आहेत? मला माहिती नाही. भाजपने तीनवेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. अनेकवेळा राष्ट्रवादीला फोडण्याचे प्रयत्न झाले. पण त्यांना अपयश आले. यावेळी मात्र भाजपला ते शक्य झाले. त्यांना काहीही करुन सत्तेत यायचे आहे. साम दाम दंड भेद असे स्वत: देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “शरद पवार चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून पवारसाहेबांनी एकदाही विधानसभा निवडणूक लढवली नाही. इंडिया आघडीतले सगळे लोक आजही पवार साहेबाना नेता मानतात. आमचे आमदार पवारांच्याच नेतृत्वात निवडून येतात. अनेकवेळा आमचा पक्ष राज्यात एक नंबरला होता.”