संग्रहित छायाचित्र
महादेव बेटिंग अॅप प्रकरणी आणखी काही बॉलिवूड कलाकारांना ईडीने समन्स बजावले आहे. आता या प्रकरणात आणखी एका मोठ्या अभिनेत्रीचे नावदेखील पुढे आले आहे. ईडीनेही रणबीर कपूरनंतर आता श्रद्धा कपूरला समन्स बजावत चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे बॉलिवूड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
महादेव ऑनलाइन सट्टा अॅप प्रकरणातील अंमलबजावणी संचालनालयाचा तपास आता श्रद्धा कपूरपर्यंत पोहोचला आहे. तपास यंत्रणेने तिला समन्स बजावले असून तिलादेखील रायपूर येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याआधी ईडीने रणबीर कपूरलाही समन्स पाठवले आहे. रणबीरने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.
महादेव अॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाचे व्यवहार झाल्याचा आरोप आहे. यामध्ये हवाला व्यापाऱ्यांचा सहभाग आहे. महादेव अॅपने केलेल्या मनी लाँड्रिंगची ईडी चौकशी करत आहे. कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि हिना खान यांनाही ईडीने वेगवेगळ्या तारखांना चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणी आरोपी म्हणून या स्टार्सचा समावेश नसल्याचे ईडहीने नमूद केलेले आहे. ईडीकडून त्यांना पेमेंट करण्याच्या पद्धतीबद्दल चौकशी केली जाणार आहे.
रणबीर, श्रद्णासह या कलाकारांनी महादेव अॅपचे प्रमोशन केल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी त्यांना रोख रक्कम देण्यात आली. महादेव अॅपच्या प्रचारासाठी रणबीर कपूरने अनेक जाहिराती केल्याचा दावा एजन्सीने केला आहे. यातून त्याला मोठी रक्कम मिळाली. गुन्ह्यातून मिळालेल्या पैशातून हा पैसा उभा करण्यात आला होता.
महादेव अॅप हे एक व्यापक सिंडिकेट असल्याचा आरोप ईडीने केला आहे. हे निनावी बँक खात्यांद्वारे मनी लॉन्ड्रिंग आणि बेकायदेशीर बेटिंग वेबसाइटसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म प्रदान करते. नवीन ऑनलाइन गेमिंग नियमांनुसार, सट्टेबाजीवर बंदी घालण्यात आली आहे. महादेव अॅप कंपनीचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे भिलाई, छत्तीसगड येथील आहेत. ते त्यांचा काळा धंदा दुबईतून चालवतात. तपास यंत्रणेने असा दावा केला आहे की ते असे चार-पाच अॅप्स ऑपरेट करतात आणि दररोज सुमारे २०० कोटी रुपये कमावतात.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.