प्रातिनिधिक छायाचित्र....
Salman Khan House Security : सलमान खानच्या घराला बुलेटप्रुफ भिंत बांधण्यात आली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लॉरेन्स गँगशी संबंधित असलेल्या गुंडांनी मुंबईतील सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार केला होता. त्यानंतर सलमानच्या घरी सुरक्षा वाढवण्यात आली. आता त्याच्या बाल्कनी आणि खिडक्या बुलेटप्रुफ झाल्या आहेत.
गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये काही काळ रिनोव्हेशनचे काम सुरू होते. आता अपार्टमेंटचा एक व्हीडीओ समोर आला आहे. सात त्याची बाल्कनी आणि खिडक्या बुलेटप्रुफ काचेसह दिसत आहेत. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सलमानची सुरक्षा यंत्रणा हायटेक करण्यात आली आहे. घराभोवती हाय रिझोल्यूशनचे सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत.
सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटच्या तळमजल्यावर वन बीएचकेमध्ये राहतो, तर त्याचे पालक या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहतात. आठ महिन्यांपूर्वी १४ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार करण्यात आला होता. ज्यांनी गोळीबार केला ते घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. गोळीबार त्याच भिंतीवर झाला, ज्यापासून थोड्या अंतरावर सलमानची बाल्कनी आहे.
घटनास्थळावरून फॉरेन्सिक तज्ज्ञांना जिवंत गोळी सापडली होती. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स ग्रुपने घेतली होती. सलमानचे जवळचे मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची मागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी हत्या झाली होती. या घटनेची जबाबदारी लॉरेन्स गँगने घेतली होती. तेव्हापासून सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सलमानच्या घराबाहेर किंवा जवळ कोणतेही वाहन थांबू दिले जात नाही.
सलमानला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा मिळाली होती. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर वाय प्लस सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. २०२३ मध्ये लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाल्यानंतरच सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्याला महाराष्ट्र सरकारकडून वाय प्लस श्रेणीची सुरक्षा मिळाली. या सुरक्षा वर्तुळात ११ जवान नेहमीच सलमानसोबत राहतात, ज्यात एक किंवा दोन कमांडो आणि दोन पीएसओदेखील असतात. सलमानच्या गाडीला पुढे आणि मागे नेहमी दोन वाहने असतात. यासोबतच सलमानची कारही पूर्णपणे बुलेटप्रुफ आहे.