संग्रहित छायाचित्र
नॅशनल क्रश असलेली दक्षिणेतील अभिनेत्री साई पल्लवी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच साईचा एक फोटो समोर आला होता, त्यात तिने लग्नात घालतात तसा फुलांचा हार घातलेला दिसत होता. हे छायाचित्र समोर आल्यावर सोशल मीडियावर साईने राजकुमार पेरियासामी या दक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शकाशी लग्न (Sai Pallavi marriage) केल्याची अफवा पसरली. मात्र, खुद्द साईनेच या प्रकरणावर मौन तोडत लग्नाच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
साई म्हणाली, ‘‘प्रत्यक्षात तो फोटो माझ्या नवीन चित्रपटाच्या मुहूर्त पूजेचा होता. चुकीच्या बातम्या पसरवण्यासाठी लोकांनी जाणूनबुजून या फोटोचा वापर केला. मला अफवांची पर्वा नसते. पण जेव्हा त्यात कुटुंब आणि मित्रांचा समावेश असतो, तेव्हा मला बोलायचे असते. हा माझ्या चित्रपटाच्या मुहूर्त पूजेच्या कार्यक्रमाचा फोटो आहे, जो मुद्दाम क्रॉप केला गेला.’’
साईचा हा फोटो ‘एसके २१’ या चित्रपटाच्या मुहूर्त समारंभातील आहे, तो क्रॉप करून शेअर करण्यात आला आणि साईचे लग्न झाल्याचे सांगण्यात आले होते. राजकुमारने साईच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर केला होता. ती दिग्दर्शक शिवकार्तिकेयन यांच्या आगामी चित्रपट ‘एसके २१’ मध्ये दिसणार आहे. राजकुमार पेरियासामी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. साईचा हा फोटो या चित्रपटाच्या पूजेच्या वेळचा आहे. यावेळी सर्वांना पुष्पहार घालून टिळा लावण्यात आला. फोटोमध्ये साई दिग्दर्शक राजकुमारसोबत उभी होती. मे महिन्यात साईच्या वाढदिवसानिमित्त राजकुमारने हा फोटो शेअर केला होता. दोघांचा तोच फोटो क्रॉप करून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ‘एसके २१’मध्ये साईसोबत शिवा कार्तिकेयन मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर भुवर अरोरा आणि मीर सलमानदेखील महत्वाच्या भूमिका साकारत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.