संग्रहित छायाचित्र
भारतातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे एस. एस. राजमौली यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर एस. एस. राजामौलींनी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावरील बायोपिकची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या या बायोपिकची चर्चा सुरू आहे. ट्वीटरवर (एक्स) एस. एस. राजामौली यांनी नव्या चित्रपटाची घोषणा करत एक टीझर शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, “जेव्हा मी पहिल्यांदा चित्रपटाची कहाणी ऐकली तेव्हा मी भावुक झालो होतो. खरंतर बायोपिक करणे हे खूप अवघड काम असते, पण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक यांच्यावर बायोपिक करणे त्याहूनही आव्हानात्मक आहे. हा बायोपिक बनवणे ही माझ्यासाठी कठीण गोष्ट आहे. 'फादर ऑफ इंडियन सिनेमा' यांच्यावर सिनेमा बनवणे ही माझ्यासाठी चॅलेजिंग गोष्ट आहे. आमची टीम या सिनेमासाठी सज्ज आहे. अभिमानाने आम्ही हा सिनेमा तुमच्या भेटीला आणू.
राजामौली यांच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘मेड इन इंडिया’ असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नितीन कक्कड यांच्यावर देण्यात आली आहे. तर राजामौली या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. नितीन कक्कड यांनी ‘फिल्मिस्तान’, ‘मितरों’, ‘नोटबुक’ आणि ‘जवानी जानेमान’ यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
दादासाहेब फाळके यांना 'फादर ऑफ इंडियन सिनेमा' असं म्हटलं जातं. 'भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक' असे त्यांना म्हटले जाते. दादासाहेब फाळके यांनी सिने-निर्मितीचे तंत्र भारतात आणून भारतीयांना चित्रपटाची ओळख करून दिली. पुढे १९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ सिनेमांची आणि २६ लघुपटांची निर्मिती केली. दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर आधारित 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या सिनेमाचीदेखील निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमात दादासाहेब फाळके यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे.
माहितीनुसार, ‘मेड इन इंडिया’ चित्रपट हा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळमबरोबर मराठीतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटाची प्रोसेस सुरू असून स्टारकास्टबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण चित्रपटाच्या टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये ‘मेड इन इंडिया’विषयी उत्सुकता वाढली आहे.