अभिनेत्री पूजा हेगडे ( Pooja Hegde ) हिने फक्त दाक्षिणात्य सिनेविश्वात नाही तर, बॉलिवूडमध्येदेखील स्वतःची भक्कम ओळख तयार केली आहे. एकेकाळी सलमान खानसोबत नाव जोडण्यात आलेली ही अभिनेत्री एका क्रिकेटपटूसोबत विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
पूजाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावरदेखील ती मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. या अभिनेत्रीच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यासंबंधी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. पूजाचं नाव सलमानसोबत जोडण्यात आलं होतं, पण या सर्व चर्चा म्हणजे फक्त आणि फक्त अफवा असल्याचं स्पष्टीकरण पूजाने दिलं होतं.
सलमानसोबतच्या कथित रिलेशनशिपच्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्यानंतर आता पूजा एका क्रिकेटरसोबत सीरियस रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त तिच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या हवाल्याने देण्यात आले होते. तो क्रिकेटपटू कोण, हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. विशेष म्हणजे, क्रिकेटपटूबाबत रंगणाऱ्या चर्चांवर पूजाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देणे टाळलेले आहे. त्यामुळे या प्रकरणात नक्कीच कुठेतरी पाणी मुरत असल्याची भावना तिच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.
सांगायचं झालं तर, पूजाचे नाव क्रिकेटपटूसोबत जोडले जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीदेखील पूजा कर्नाटक येथील एका क्रिकेटरसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. एवढंच नाही तर, तिच्या भावाच्या लग्नातदेखील तो क्रिकेटपटू उपस्थित होता, पण नंतर खुद्द पूजाने हे वृत्त नाकारले होते. आता पुन्हा पूजाचे नाव एका क्रिकेटपटूसोबत जोडले जात आहे. या निमित्ताने कामापेक्षा तिच्या खासगी आयुष्याची चर्चाच जास्त प्रमाणात होत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.